गडचिरोली,दि.15 : “बँक सेवा पासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या गरिबांना जोपर्यंत कर्जपुरवठा व अन्य बँक सेवांचा लाभ मिळत नाही तोपर्यंत बँक शाखांचा विस्तार आणि वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही” असे प्रतिपादन दीपक सिंगला, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अमिर्झा येथे आयोजित केलेल्या वित्तीय साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. उपजीविकेसाठी विविध उत्पन्न देणाऱ्या उपक्रमांसाठी बँकांकडून कर्ज पुरवठ्याचे महत्व विशद करताना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना व विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांना आवाहन केले की विविध शासन पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करताना सकारात्मक विचार करावा. ते म्हणाले की कर्जपुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून जे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे लोकांमध्ये असमाधान व असंतोष आहे. याच कारणासाठी शासन पुरस्कृत योजनांतर्गत बँकांकडे पुरस्कृत केलेल्या सर्व प्रस्तावांचा मी स्वत: आढावा घेणार आहे. ज्या बँक शाखा हे काम करणार नाहीत त्यांची गंभीर दखल घेतली जाईल असेही ते पुढे म्हणाले.
गडचिरोली जिल्हयामधील बँकांनी ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी आपल्या सर्व शाखांमार्फत वित्तीय साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व कार्यक्रमात बँक सेवा, विमा, किसान क्रेडिट कार्ड आणि शासन पुरस्कृत योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. त्यासाठी शासनाचे कृषी विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, दुग्ध व्यवसाय विभाग, खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच आरसेटी यासारख्या विविध विभागांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. नाबार्ड पुरस्कृत वित्तीय साक्षरता मोबाईल व्हॅन द्वारे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी बोलताना राजेंद्र चौधरी, जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड यांनी सांगितले की गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नियुक्ती होणे म्हणजे गरीब, वंचित व ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत आपण पोहोचलो नाही, अशा लोकांची सेवा करण्याची संधी आहे. सतीश अहिलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली डीसीसीबी यांनी बँकेच्या ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. बँकेने केलेल्या कामाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्यासाठी श्री अहिलवार यांनी आभार मानले. या सर्व कार्यक्रमास बँकेचे ग्राहक, शासन पुरस्कृत योजनांचे लाभार्थी तसेच स्वयंसहायता समूहाच्या महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. हा कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करण्यासाठी गडचिरोली मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमिरजा शाखेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.