भंडारा,दि. 16 :- – जिल्हा वार्षिक योजना सन 2019- 20 या आर्थिक वर्षासाठी सर्व साधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्र बाह्य या योजनांची अंमलबजावणी तातडीने करून यंत्रणांनी प्राप्त निधी 31 मार्चपर्यंत खर्च करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागांनी 31 मार्च पर्यंत निधी खर्च करावा तसेच अखर्चित निधी तात्काळ परत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्या.
प्रशासकीय मान्यता घेणे बाकी असल्यास तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे ते म्हणाले. निधीची बचत असल्यास यंत्रणांनी लेखी प्रस्ताव नियोजन अधिकारी यांना सादर करावा. अनेक यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्र सादर केले नाही ते सुध्दा तातडीने सादर करण्यात यावे असे म्हणाले. नाविन्यपूर्ण व पूनर्विनियोजनासाठी निधीची मागणी असल्यास तात्काळ सादर करावी. प्राप्त निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत कृषी व संलग्न सेवा, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, समाज कल्याण, आदिवासी विकास सार्वजनिक बांधकाम, कौशल्य विकास, रेशीम, नगरविकास, जलसंधारण, लघुपाटबंधारे, पाणलोट, जिल्हा उद्योग केंद्र, पर्यटन, सामाजिक व सामूहिक सेवा, नाविन्यपूर्ण योजना, जलयुक्त शिवार, यासह विविध योजनेच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.