सडक अर्जुनी,दि.17 : तालुक्यातील गिरोला, हेटी, टेमनी या परिसरात ४ दिवसापूर्वी वादळीवार्यासह गारपिटीचा पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना तसेच राहत्या घरावरील कवेलुंच्या नुकसान झाले असून या गाव परिसरातील मोठे वृक्ष सुद्धा कोलमडून खाली पडले. तर विद्युत खांब ही तुटुन पडल्याने यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आज (दि.१६) गिरोला, हेटी, टेमनी या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरीत पंचनामे करा, असे निर्देश दिले व महावितरणचे उपविभागीय अभियंता नायडू यांना वीज जोडणी करून वीज पुर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वारा व गारांचा पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. अशातच ४ दिवसापूर्वी सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला, हेटी, टेमनी या परिसरातील इतर गावात झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने खरांचे व रब्बी हंगामातील धान पिकांसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे या परिसराची आमदार चंद्रिकापुरे यांनी पाहणी केली असून नुकसानग्रस्ता तात्काळ मदत मिळविण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने स्तरित पंचनामे करावे, असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, डॉ. अविनाश काशिवार, भैय्यालाल पुस्तोडे व शेतकरी व गावकरी उपस्थित होते.