सडक अर्जुनी,दि.21ः-कोरोना व्हायरसच्या मोठ्या प्रमाणात राज्यात प्रसार होत असून त्याचा ग्रामीण भागात देखील प्रसार होऊ नये, म्हणून भारतीय जनता पार्टी तालुका सडक अर्जुनीच्या वतीने तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकार्यांनी सडक अर्जुनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्या नावे (दि.२0) निवेदन दिले.
निवेदनात तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून खबरदारी बाळगण्याच्या अनुषंगाने निवेदन सादर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व स्वस्त धान्य दुकानातून नाममात्र कमी किंमतीत माक्स व सेनेटाईजर तसेच हात धुन्यासाठी साबून व नॅपकिन इत्यादी तात्काळ स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात यावे, तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात प्रवेश द्वाराजवळ हाथ धुन्यासाठी पाणी व डेटॉल लिक्वीड आदिंची सुविधा पुरविण्यात यावी. तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांची तातळीची सभा घेऊन पुणे व मुंबई तसेच इतर भागातून आलेल्या प्रवास्यांची माहिती काढून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन नायाब तहसीलदार गावड यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात पं.स. सभापती गिरधारी हत्तीमारे, लक्ष्मीकांत धानगाये, शेषराव गिर्हेपुंजे, विलास चव्हाण, हर्ष मोदी, शिशिर येडे, तुकाराम राणे, खेमराज भेंडारकर, प्रशांत सहारे, मनोहर गहाणे, मोसिम सोनवाने, देवलाल कटरे, जिजा पटोले, जागेश्वर पटोले आदी उपस्थित होते.