तिरोडा,दि.21 : कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ तसेच या विषाणूवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कामे करावे, असे प्रतिपादन आ़मदार विजय रहांगडाले यांनी केले़.ते स्थानिक नगरपरिषद येथे आयोजित सभेत बोलत होते़ यावेळी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, तहसीलदार प्रशांत गुरुडे, गटविकास अधिकारी एस़ एम़ लिल्हारे, ठाणेदार उद्धव उमाळे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल मोहने, नगर परिषदेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यात कोरोना रोगाचा संसर्ग होवू नये म्हणून सर्वांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन आ.रहांगडाले यांनी केले. यावेळी न.प. मुख्याधिकार्यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नगरपालिकेतर्पेâ नगरपालिकेच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून रविवारी भरणारा तिरोडा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तर सर्वत्र स्वच्छता ठेवण्यात येऊन औषध फवारणी सुरू असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली़ दरम्यान, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी तिरोडा नगरपरिषदेच्या लिटिल बर्ड कॉन्व्हेंटमध्ये पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली असून तेथे आवश्यक त्या वैद्यकीय बाबी आरोग्य विभागाने पुरवाव्या, असे सांगितले. अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम यांनी संशयित रुग्णांची वेगळी व्यवस्था असून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास त्यात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ़ शीतल मोहने यांनी चांदोरी आरोग्य उपकेंद्रात तेरा खाटांचे रुग्णालय तयार करण्यात आले असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नगरपरिषद कर्मचार्यांनी तिरोडा शहरातील एका हॉटेलमध्ये विदेशी नागरिक थांबले असून त्यांची तपासणी करण्यात यावी, अशी विनंती केली. दरम्यान, आ़ रहांगडाले यांनी उपस्थित सर्व नगरसेवक, अधिकारी व नागरिकांना तिरोडा तालुक्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून काही सूचना असल्यास कळवावे, असे आवाहन करून रोजगारासाठी विदेशात गेलेल्या लोकांची संख्या तालुक्यात मोठी असून तेथून परत येणारे नागरिक, विदेशी नागरिक किंवा प्रवासी यांच्यावर संबंधित विभागाने लक्ष ठेऊन संबंधित व्यक्तीची योग्य प्रकारे तपासणी करावी. नागरिकांनी देखील ताप, सर्दी, खोकला असल्यास रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व साध्या पध्दतीने विवाह सोहळ्े पार पाडावे, अशा सूचना आ.विजय रहांगडाले यांनी उपस्थितांना केल्या.