जिल्ह्यातील पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे,मध्य विक्रीची दुकाने बंद

0
101

गोंदिया दि.२२ः जगातील अनेक देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाधा झाल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सुद्धा या विषाणूच्या संसर्गामुळे अनेक जण बाधित झाले आहे. राज्यात देखील काही भागात या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रकारची पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.सदर पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे ज्या विभागांतर्गत येतात त्यांनी त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती व संबंधित प्रमुखावर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 13 मार्चपासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. या विषाणूला प्रतिबंध करण्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व बिअर शॉपी,वाईन शॉप,परमिट रूम, बार अँड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने व इतर सर्व प्रकारच्या मद्य विक्रीची दुकाने २२ मार्च रोजी सकाळी ६ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, गोंदिया यांना तात्काळ कार्यवाही करून दैनंदिनरीत्या तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही या आदेशात दिले आहे.