शहरी भागात आजपासून जमावबंदी आदेश लागू 

· केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहणार · सर्व धार्मिक स्थळे बंद · अत्यंत महत्वाच्या कामानिमित्तच घराबाहेर पडा

0
983

गोंदिया दि. २3 : कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात आज २३ मार्च २०२० रोजीच्या सकाळी ५ वाजतापासून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आली आहेे.त्यामुळे ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र येता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडें यांनी दिले आहेत.

या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात २२ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत जनता संचारबंदी होती.ती आता २३ मार्च २०२० रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. २३ मार्च २०२० रोजी सकाळी ५ वाजतापासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी एकत्र येणार नाही.

किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ ५ टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडें यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.