गोंदिया दि. 23 कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे.हॉटेल मालकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राहकांची विशेष दक्षता घ्यावी आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 23 मार्च रोजी हॉटेल्स मालक व टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑपरेटर्स यांची कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजन्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉक्टर बलकवडे पुढे म्हणाल्या, हॉटेल मालकांनी हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी मास्कची व्यवस्था करावी. रेस्टोरेंट मालकांनी ग्राहकांना घरपोच सेवेतून खाद्यपदार्थ देण्याची व्यवस्था करावी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर यांनी घरूनच ऑनलाइन व्यवहार करावे.होम कवॉरंटाईनमध्ये असलेल्या व्यक्ती जर बाहेर फिरत असेल तर ताबडतोब नियंत्रण कक्षाच्या (07182)230 196 या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला हॉटेल्सचे मालक आणि टूर्स ट्रॅव्हल्स कंपन्यांचे ऑपरेटर उपस्थित होते.