गोंदिया दि.24 जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.राज्यात नोवेल कोरोना -19 या विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूला तातडीने अटकाव करण्याची गरज निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आवश्यक झाले आहे.
जिल्ह्यातील शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहितेची 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले होते,परंतु कोरोना विषाणू संसर्ग संबंधात सध्याची स्थिती लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात अर्थात संपूर्ण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेची कलम 144 लागू केली आहे. हा आदेश लागू झाल्यानंतर पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एका ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू व सेवा यांच्या आस्थापना सुरू राहतील. एखादी सेवा अथवा आस्थापना आवश्यक आहे अथवा नाही याबाबत प्रश्न उदभवल्यास जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ पाच टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये.आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल,असे या आदेशात म्हटले आहे.