
मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांचे आवाहन: सर्व यंत्रणेचे ऑनलाईन प्रशिक्षण आणि आढावा
गोंदिया, ता 14 : महिला व मुर्लीना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासह त्यांच्या सशक्तीकरणास चालना देण्यासाठी संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ राबविण्यात येत आहे. जिल्हयातील सर्वच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांचे अर्ज वेळेत दाखल करण्यासाठी सुक्ष्मनियोजन करण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी केले.
शनिवारी (ता. 13) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण तथा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हयातील आठही पंचायत समितीच्या संपूर्ण यंत्रणेसह संवाद साधतांना ते बोलत होते. उल्लेखनीय म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी योजनेंतर्गत कामाची पाहणी करण्यासाठी आमगाव पंचायत समितीचा आकस्मिक दौरा केला. तिथूनच त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण तथा आढावा घेतला. सर्व आठही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी सांख्यिकी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ऑनलाईन कार्यशाळेत उपस्थित होत्या. माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसमिती स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी याप्रसंगी दिले. जिल्हयातील जवळपास पाच लक्ष महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच अर्ज दाखल करावयाचे आहेत. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजनाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात दररोज प्रत्येकी अडीच हजारापेक्षा अधिक अर्ज दाखल करावे. त्यासाठी गटविकास अधिकारी आणि सीडीपीओ यांचे नियोजन तथा यंत्रणेच्या कामाकडे लक्ष असणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. गावागावात छोटे-छोटे कॅम्पचे आयोजन करण्यावर भर देवून योजनेच्या प्रचार व प्रसारावरही त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले ग्रामसेवक आशा, अंगणवाडी सेविका यांना कार्यप्रवृत्त करून दररोजचे उद्दीष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापि योजनेसंदर्भात प्रत्येक आठवडयाला गटविकास अधिकारी आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंधम म्हणाले. जिल्हा परिषद गोंदिया येथून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, आणि जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचे विभागप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते