अकोला, दि.१3 (जिमाका) : पालकमंत्री बच्चू कडू यांनी मुर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालय येथे भेट देवून कोरोना विलगीकरण कक्ष व कोरोना कक्षाला भेट दिली. यावेळी कोरोना विलगीकरणमध्ये असलेल्या व्यक्तीची भेट घेवून त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र नेमाणे, डॉ.विजय वाडेकर, डॉ.धनंजय चिमनकर व विलगीकरण, वार्ड इंचार्ज हर्षा मानेकर तसेच मुर्तिजापुरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांची उपस्थिती होती. कोरोना बाधितांच्या उपचाराची सुविधा म्हणून उपजिल्हा रूग्णालय पूर्णत: सज्ज असावे, त्यासाठी त्यांनी पाहणी केली. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला सौजन्याची वागणूक देवून त्यांच्या मनातली भीती घालवण्याच्या सल्ला पालकमंत्री श्री.कडू यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिला. त्यांनी यावेळी उपजिल्हा रूग्णालयाची पाहणी करून रूग्णाची आस्थेने विचारपूस करून त्यांना धैर्य दिले.