
भंडारा, दि. 21 :– जिल्हयातील मुख्य नदी वैनगंगा असून नदीकाठावर 154 गावे आहेत. त्यापैकी 130 गाव पूर बाधीत आहेत. पावसाळा सुरु होण्यास 15 दिवस शिल्लक असल्याने आतापासूनच तयारी करुन मॉकड्रिलचे आयोजन करुन नदीकाठावरील पुरबाधित गावावर फोकस ठेवा. कोणतीही अनुचित घटना घडून वित्त व मनुष्यहानी होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सर्व संबंधितांना दिल्या.
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने मॉकड्रिल तसेच कर्मचाऱ्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल व रस्स्त्यांचे दुरुस्तीची कामे पावसाळयापूर्वी आटोपावे. जलसंपदा विभागाने पूर निवारण यंत्रणा तसेच विद्युत व पोलीस यंत्रणा सज्ज ठेवावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
लाखांदूर तालुक्यातील आवळी हे गाव वैनगंगा व चुलबंद नदीच्या मध्ये आहे, ते एक बेटच आहे. नेहमी पुरामुळे त्यांचे नुकसानस होते. आवळीचे पुनर्वसन इंदोरा गावात करण्यात आले आहे. परंतु आवळी येथील शेती सुपिक असल्याने गावकरी गाव सोडत नसल्याने नेहमी त्यांना पुराचा तडाखा लागतो. त्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोगरे यांनी केला. पूरपरिस्थिती नागरिकांनी नदीच्या पाण्यात डोंगे नेऊ नये. डोंग्यांची दुरुस्ती करुन घ्यावी. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकडे लक्ष दया, अशा सूचना त्यांनी केल्या.
याबाबत तहसिलदार लाखांदूर यांनी प्रत्यक्ष भेट देवून तेथील लोकांना पूरपरिस्थीतीची जाणीव करुन देवून समस्येचे निराकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवून सर्व औषध साठा उपलब्ध ठेवावा. आरोग्य विभागाचे 108 वाहन सुस्थितीत ठेवावे. या काळात नगर पालिका व गटविकास अधिकारी यांनी शुध्द पिण्याच्या पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
नदीकाठावरील अतिक्रमण धारकांना कोणतीही मदत देवू नये. याबाबत त्यांनी नोटीस दयावी. पुरपरिस्थितीचा कामासाठी मुख्याधिकारी व तहसिलदार यांना इन्सीडेंट कमांडर म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुरबाधित 130 गावावर फोकस करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामावर महिला कर्मचाऱ्यांनी नियुक्ती न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पुरामुळे दुषित पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा विभागाने र्निजंतुकीकरण व्यवस्था तयार ठेवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरणाद्वारे नदी, पुरपरिस्थिती, मॉकड्रिल, तसेच याकाळात प्रत्येक विभागाच्या कामाची माहिती दिली. यावेळी बांधकाम विभाग, आरोग्य, पोलीस, नगरपालिक, विदुयत विभाग, राज्य परिवहन विभाग, केंद्रीय जल आयोग, गोसीखुर्द, पुरवठा विभाग, जलसंपदा आदि विभागाचा आढावा घेण्यातआला.