करोनाच्या विळख्यात अर्जुनी मोर तालुका,प्रशासन झाले सतर्क

0
1772

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.22ः-गेल्या काही महिन्यापासून करोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सातत्याने शासनस्तरापासून गावपातळीवर प्रयत्न चालविले जात आहेत.त्यातच गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्यात आढळलेल्या रुग्णानंतर चौथ्या टप्यात एकाच दिवशी 26 रुग्ण आढळल्याने खळबळ माजली.विशेष म्हणजे यातील बहुतांश हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असल्याने प्रशासनावर ताण पडले असून कसोटी लागणार आहे.त्यातच करोना पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन घोषित झालेल्या करांडली व अरुणनगर गावांना भेट देत उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी प्रशांत ढोले यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीसोबत चर्चा करीत त्यांना काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले आहे. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत फिजिकल(सोशल)डिस्टंस पाळणे,मास्कचा वापर करणे,अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पाहणी दरम्यान केले.

जिल्ह्यात सध्याच्या घडीला 28 रुग्ण एक्टीव परिस्थितीत असून 1 निगेटिव्ह झालेला रुग्ण आहे.मात्र चौथ्या टप्यात या रुग्णसंख्येत भर पडली ती मुंबईवरुन ट्रकने आलेल्या मजुरामुळे.त्यातही सर्वाधिक रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील असल्याने त्या त्या गावामध्ये जनजागृतीसोबतच उपाययोजनावर महसुल विभागासोबतच पोलीस प्रशासनानेही काम सुरु केले आहे.15 मे रोजी मुंबईला रोजगारासाठी गेलेले जवळपास मजूर एका ट्रकने जिल्ह्यातील स्वगावी पोहोचले.त्यापैकी करांडली येथील एक मजूर हा कुरखेडा येथील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तो सुध्दा बाधित झाल्याने त्या मजुराचे गाव असलेले करांडली परिसर कँटोन्मेंट झोन म्हणून 19 मे पासून जाहीर करण्यात आले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रुग्ण त्याची सासुरवाडी अर्जुनी-मोर तालुक्यातील अरुणनगर येथे येऊन गेल्याने दिनांक 21 मे पासून अरुणनगर परिसराला कँटोन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.त्यातच 21 मे च्या रात्रीपर्यंत अर्जुनी-मोर तालुक्यात जवळपास पंचवीस नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण अर्जुनी-मोरगाव तालुक्यावरच कंटेनमेंट झोन होण्याची वेळ आली असून नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सध्या रब्बी हंगामातील धानपिकाची कापणीचे काम सुरु झाले असून खरीप हंगामालाही सुरवात होणार असल्याने शेतकरी वर्गात या वाढत्या आकड्यामुळे करांवे तरी काय अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.