
गोंदिया दि.25 – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर तसेच संस्थात्मक विलगीकरण केन्द्रात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची आरोग्य विषयक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे.या समितीच्या माध्यमातून प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक माहिती व सुविधेचा आढावा घेण्यात येत आहे.
या समितीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक हे समितीचे सचिव असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, इंडियन मेडीकल कौन्सिलचे जिल्हाध्यक्ष, वैद्यकीय महाविद्यालयाचे फिजीशीयन आणि जिल्हा साथरोग अधिकारी हे सदस्य आहेत. ही समिती जिल्ह्यातील प्रत्येक कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या सोयी-सुविधेच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन रुग्णांशी थेट संवाद साधून सोयीसुविधाची माहिती घेतली जात आहे.या समितीच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुषणकुमार रामटेके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत तुरकर, डॉ. निरंजन अग्रवाल,इंडियन मेडीकल कौन्सीलचे सचिव डॉ.राणा हे जिल्हयातील सर्व कोविड केअर सेंटर (CCC) येथे भेट देऊन रुग्णांच्या समस्या जाणून घेत आहेत.
समितीच्या माध्यमातून आठवड्यात एकदा टप्याटप्याने सर्व कोविड केअर सेंटरचे नियमीत निरीक्षण करण्यात येत आहे.16 व 23 ऑगस्ट 2020 रोजी या समितीने कोविड केअर सेंटर गोरेगाव, सडक/अर्जुनी, नवेगावबांध, आमगाव, सालेकसा व देवरी येथील कोविड केअर सेंटरचे निरीक्षण करून करून भेट दिली.तर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.देशमुख यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गोंदिया, क्रिडा संकुल गोंदिया, आयुर्वेदीक महाविद्यालय कुडवा गोंदिया,किरसान इंटरनेशनल स्कुल, गोरेगांव,आदिवासी मुलांचे वसतीगृह सडक/अर्जुनी,बी.ए.डी.महाविद्यालय नवेगांव, कोविड केअर सेंटर सरांडी, तिरोडा, डीसीसीसी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा या ठिकाणी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधून विविध समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे.
कोविड केअर सेंटर (CCC) येथे पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधेच्या अनुषंगाने चहा, नास्ता, स्वच्छता, भोजन,पिण्याचे व आंघोळीचे पाणी, वैद्यकीय तपासणीबाबत माहिती घेतली जात आहे. तसेच ही समिती कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांशी दररोज फोनवर संवाद साधून सर्व प्रकारच्या सोयी/सुविधेबाबत माहिती घेत आहे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थीतपणे घेण्यात यावी तसेच तातडीच्या प्रसंगी त्यांना त्वरीत आवश्यक उपचार मिळावे यासाठी नोडल अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.तसेच कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय चमुला बाधित रुग्णांच्या आरोग्याची नियमीत काळजी घेण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले आहे. या सीसीसी सेंटरमध्ये स्वच्छता राहावी तसेच कोरोना बाधित रुग्णांना उत्तम भोजन मिळावे यासाठी समितीकडून सूचना देण्यात आल्या आहे.तसेच रुग्णांना काही समस्या असल्यास त्यांना समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर येथे सर्व संबंधित अधिकारी, नोडल अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात येत आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आरोग्य विषयी किंवा इतर समस्या असल्यास संबंधित तालुक्याशी किंवा 8308816666 / 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी.