जनभावनेचा आदर करा; अन्यथा तीव्र आंदोलन

0
729

भंडारा,दि.25ःजवाहरनगर ते भंडारा रोड (वरठी)च्या दरम्यान रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यात यावे व जोपर्यंत रेल्वे लाईनच्या नविनीकरणाची योजना बनत नाही तोपर्यंत रेल्वे लाईन यथास्थितीत ठेवण्यात यावी या आशयाचा प्रस्ताव सर्वदलीय बैठकीत पारित करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे होते तर खा. सुनील मेंढे, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे, भंडारा रेल समितीचे अध्यक्ष प्रेमराज मोहोकर, सचिव रमेश सुपारे,ड्रामा संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल (गोंदिया) व विजय खंडेरा उपस्थित होते. रेलयात्री समिती भंडाराने या बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीत, रेल्वे लाईन खराब झाली असली व रेल्वे चालविणे शक्य नसले तरी सध्या असलेली रेल्वे लाईन काढणे हे योग्य नाही. या ठिकाणी वृक्षारोपण करणे योग्य नाही. कारण भविष्यात रेल्वे विकासाची संभावना शुन्यात जाईल, असा सूर उमटला.
रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल (गोंदिया) यांनी रेल्वे लाईन काढणे योग्य नसल्याचे सांगितले. तर सेवक कारेमोरे यांनी जनतेला विश्‍वसात न घेता रेल्वे लाईन काढणे हे चुकीचे असल्याचे सांगितले. प्रेमराज मोहोकर,डॉ.विनोद भोयर,प्रविण उदापुरे यांनीही विचार मांडले.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्वत: रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविले. ते म्हणाले, जनतेत तिव्र आक्रोश आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी जनभावना लक्षात घ्यावी. ही रेल्वे लाईन काढू देणार नाही व पुनश्‍च लाईन काढण्याचे काम सुरू झाल्यास आपल्या कार्यकर्तांसह काम बंद पाडू, असा इशारा दिला.
आमदार राजू कारेमोरे यांनी या रेल्वे लाईनमुळे भविष्यात विकासाची अपेक्षा असून रेल्वे लाईन काढल्यास आपली पुढची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही म्हणून ही लाईन काढणे योग्य होणार नसल्याचे म्हटले.
खासदार सुनील मेंढे यांनी आपण जनभावनेसोबत असल्याचे म्हटले व यासंबंधी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठविण्याचे व लोकसभेत या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी सर्वदलीय शिष्टमंडळासोबत रेल्वे मंत्रालय व अधिकाठयांना भेटण्याचे आश्‍वासन दिले.
जवाहरनगर -वरठी रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्यासाठी सर्वदलीय रेल विकास मंचचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार मधुकर कुकडे यांना सर्वसंमतीने अध्यक्ष निवडण्यात आले. त्यांनी खासदार व आमदार यांना जनभावनेचा सन्मान ठेवून रेल्वे लाईन काढण्याचे काम थांबविण्याचे आवाहन यावेळी केले.
आता खासदार सुनील मेंढे लोकसभेत तर आमदार नरेंद्र भोंडेकर व राजू कारेमोरे यासंबंधी विधानसभेत मुद्दा उचलणार आहेत. त्यामुळे पुढच्या घडामोडींकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
बैठकीनंतर सर्वदलीय समितीने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी मुलाखत घेवून त्यांना जनभावना उग्र होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगून हे जनभावनेचा विचार करता हे काम थांबविण्याची विनंती केली. बैठकीत वरियलदास खानवानी, सुरेश फुलसुंगे, बाबा बाच्छील, चंद्रकांत शहारे, विकास मदनकर, संजय मते, बबन मेर्शाम, हेंमत चंदावसकर, उमराव सेलोकर, संतोष राजगीरे, रोशन येरणे, सुरेश कोटगले, अजय मेर्शाम, प्रतिक तांबोळी, मयूर बिसेन, राजेंद्र उके, नितीन धकाते, जैकी रावलानी, भगवान झंझाड, देवीदास लांजेवार, लोकेश खोब्रागडे, विनोद भुरे, मनिष क्षिरसागर, अशोक वघरे, भाऊराव बन्सोड, हेंमत महाकाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.