उत्पादित मालाची गुणवत्ता उत्तम ठेवून महिलांनी ठोक व्यापारी व्हावे- आमदार विजय रहांगडाले

तिरोडा येथे तेजस्विनी रुरल मार्टचे उद्घाटन

0
277

तिरोडा दि.25 —  शासन धोरण निश्चित करून योजना निर्माण करण्याचे काम करते. योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आहे.बचत गटांच्या महिला आता उद्योग व्यवसायाकडे वळल्या आहे.त्यांनी उत्पादित करण्यात येणाऱ्या मालाची गुणवत्ता उत्तम ठेवून,आता त्यापुढेही जाऊन ठोक व्यापारी व्हावे,असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

नुकतेच तिरोडा येथील माविमच्या तालुका विक्री केंद्रात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या अर्थसहाय्याने महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम) गोंदियाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी रुरल मार्टचे उदघाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात आमदार  राहांगडाले बोलत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नीरज जागरे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,अदानी फाउंडेशनचे प्रमुख नितीन शिराडकर,माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, माविमचे सनियंत्रण मूल्यमापन अधिकारी श्री.कुकडकर, तेजस्वीनी लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शकुंतला बारापात्रे व सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार रहांगडाले पुढे म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. ही अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला तेजस्विनी रुलर मार्टच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे. बचतगटाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला उभे करण्याची जबाबदारी महिलांवर आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय निर्मूलन करण्यास बचतगटाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे. बचतगटाच्या महिलांनी आता व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करावे,असेही ते म्हणाले.

श्री.जागरे म्हणाले,ग्रामीण विकासात महिला ह्या महत्वपूर्ण योगदान देत आहे.त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचे काम नाबार्ड करीत आहे. महिलांनी यशोशिखरे गाठावित आणि स्वावलंबी व्हावे.असे त्यांनी सांगीतले.

श्री खर्डेनवीस म्हणाले,महिलांच्या उद्योगाला चालना देण्याचे काम बँका त्यांना पतपुरवठा करून करीत आहे.महिलांनी नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून आपली वेगळी ओळख निर्माण करावी.अशा महिलांच्या पाठिशी बँका भक्कमपणे उभ्या राहतील.बचतगटांनी उद्योग व्यवसाय सुरू केल्याने सामजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून बोलतांना श्री सोसे म्हणाले,तिरोडा तालुक्यात संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागात माविमचे स्वयं सहाय्यता बचतगटाचे कार्य सुरू असून 2400 बचतगटांची स्थापना करण्यात आली आहे.यामाध्यमातून 27000 कुटुंबांना संघटित करण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यातील 7 लोकसंचालीत साधन केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी 8 कोटी रुपये बचतगटांना वितरीत करण्यात येत आहे.114 गावातील 1600 गटांना 15 हजार रुपये फिरता निधी देण्यात आला असून 119 ग्रामसंस्थाना 3 लाख रुपये प्रमाणे 3 कोटी 57 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला.अशी माहीती त्यांनी यावेळी दिली. श्री.खडसे आणि श्री.शिराडकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

प्रारंभी आमदार विजय राहांगडाले यांनी दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तेजश्विनी रुरल मार्टचे फित कापून उद्घाटन केले. रुरल मार्टमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्याची पाहणी केली. कापडी मास्क तयार करणाऱ्या बचतगटातील महिला तसेच अन्य साहित्य निर्मिती करणाऱ्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. बचतगटातील उत्पादित केलेल्या काही वस्तूंची खरेदी देखील त्यांनी केली. तसेच बचतगटांनी तयार केलेल्या सेंद्रिय शेती प्रदर्शनीला भेट दिली व नोंदणी वहीमध्ये आपला अभिप्राय देखील नोंदविला.

शुभारंभ झालेल्या रुलर मार्टमध्ये तिरोडा तालुक्यातील ८८ महिला बचतगटांनी तयार केलेल्या ११० प्रकारच्या विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये विविध शोभिवंत लाकडी वस्तू ,बांबू आर्ट, गोंडी पेंटिंग, मायक्रोन वस्तू, कापडी बॅग,पायदान, बांगड्या, विविध प्रकारची लोणची पापड, कुरड्या, चकल्या,मुखवास,गांडूळ खत, झुंबर,अगरबत्ती,एलईडी बल्ब,विविध प्रकारच्या डाळी यासह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्यक्रम व्यवस्थापक  शिल्पा येडे, तालुका  उपजीविका व्यवस्थापक नामदेव बांगरे, बिसने, तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्र तिरोडाच्या व्यवस्थापक अनिता आदमने, रेखा रामटेके, सारिका बन्सोड, चित्रा  कावळे, मनोज बोरकर,नलू मेहर लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक, नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक संदिप राणे, लेखापाल संजय कोल्हे, सर्व लेखापाल व सहयोगिनी तसेच एनआरईटीपी चमू, मनीष सुधलवार, तन्मय राघोर्ते, वंदना राउत,अश्विनी वाल्दे यांनी परिश्रम घेतले.