नवेगावबांध,दि.26:-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील वनजमिनीवरील अतिक्रमित लाभधारकांना पट्टे उपलब्ध करुन देण्यासाठी वनविभागासोबत बैठक घेत न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दिले.ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील शासकिय विश्रामगृहात व गोठणगाव येथील आयोजित(दि.24) बैठकीत अतिक्रमणधारकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यकर्ते व जनतेच्या विविध शासकीय विभागातील अनेक अडचणी याप्रसंगी आमदार चंद्रिकापुरे यांनी जाणून घेतल्या. अनेक तक्रारींचे निवारणाच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून तक्रारींचे निवारण करण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.तत्पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे देय अनुदान देण्याच्या सूचना आमदार चंद्रिकापुरे यांनी दिल्या.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष लोकपाल गाहणे रतिराम राणे , उद्धव मेहंदळे, नीलकंठ कुंभरे, योगराज हलमारे, माजी पंचायत समिती सदस्य नाजुका कुंभारे, शालिक नाकाडे, देवाजी कुंभरे, यशवंत गणवीर, सुरेश खोब्रागडे व तक्रार करते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.