Home गुन्हेवार्ता आश्रमशाळेतील ५ मुलींवर बलात्कार, शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाला अटक

आश्रमशाळेतील ५ मुलींवर बलात्कार, शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाला अटक

0
संस्थाचालक अरविंद पवार याच्यासह आश्रमशाळेतील मनीषा कांबळे या स्वयंपाक करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. पवार याने ८ पैकी ५ मुलींवर बलात्कार केला असून ३ मुलींचा विनयभंग केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पवार हा शिवसेनेचा माजी तालुकाप्रुख असून युतीच्या काळात त्याने मिनाई आश्रमशाळेला मान्यता मिळवून ही संस्था सुरू केली. संस्थेची पहिली ते १२ वीपर्यंतची शाळा असून यामध्ये ६५० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. त्यातील २५० जण हे पवार यांच्या निवासी आश्रमशाळेत राहतात. यामध्ये ७० मुलींचा समावेश आहे. यातील काही मुलींवर आरोपी पवारने लैंगिक अत्याचार केला आहे.
वारंवार घडणाऱ्या या प्रकाराने त्रस्त झालेल्या काही मुलींनी कुरळप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना निनावी पत्र पाठवले होते. या पत्रात न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. याची दखल घेत उपनिरीक्षक चव्हाण यांनी साध्या वेषात जाऊन याबाबतची माहिती घेतली. यात संस्थाचालक पवार याने ५ मुलींवर बलात्कार, तर ३ मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
पल्लवी चव्हाण यांनी आश्रमशाळेवर छापा टाकून कारवाई केली. यात अरविंद पवार याच्यासह आश्रमशाळेतील महिला स्वयंपाक करणाऱ्या मनीषा कांबळे हिला अटक केली. या तपासादरम्यान आश्रमशाळेतील संस्थाचालक पवार याच्या खोलीत उत्तेजकद्रव्ये, अश्लील सीडी असे साहित्य सापडले आहे. या आश्रम शाळेत राहणाऱ्या बहुतांश मुलींच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची आहे. काही मुलींचे आई-वडील हयात नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या आश्रमशाळेत मुली राहत आहेत.

Exit mobile version