41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Featured News कोरोनाची तक्रार. थेट त्याच्या आईकडे.;काय भन्नाट कल्पना आहे!

कोरोनाची तक्रार. थेट त्याच्या आईकडे.;काय भन्नाट कल्पना आहे!

0
1080

blank

प्रिय, कोरोनाची आई

सप्रेम नमस्कार! विनंती विशेष

तुमचा मुलगा कोरोना नुकताच माझ्या बाबांना चावला. तो माझ्या बाबांना चावल्यामुळे आम्हाला खूप दुःख सोसावे लागले. आजूबाजूचे कोणी आमच्या घरी येत नव्हते. आम्हालाही कुठे बाहेर पडता येत नव्हते. आम्ही घराबाहेर पडू नये म्हणून आमच्या घरावर बोर्ड देखील लावला होता. माझी कोणतीही मैत्रीण माझ्याशी खेळायला येऊ शकली नाही.
तुमचा मुलगा माझ्या बाबांना चावल्यामुळे त्यांना पाच दिवस दवाखान्यात राहावे लागले. त्यांना खूप सारी इंजेक्शन घ्यावी लागली. त्यांच्या पोटात देखील इंजेक्शन टोचावे लागले. माझे बाबा खूप छान आहेत! ते कधीच कोणाचे वाईट करत नाहीत! कधीच कोणाशी भांडत नाहीत !तरीही तुमचा मुलगा त्यांना विनाकारण चावला! तुम्ही तुमच्या मुलाला समजावून सांगा. असे विनाकारण कुणाला चावणे चांगले नाही! मी दररोज पेपरमध्ये वाचते. तुमचा मुलगा दररोज शेकडो लोकांना चावतो. आतापर्यंत तो लाखो लोकांना चावला आहे. तुमच्या मुलगा इतका बंडपणा करत असतांना देखील तुम्ही शांत कशा काय राहू शकता? तुम्ही त्याला समजावून का सांगत नाही? तो तुमचे ऐकत नाही काय? मी तर माझ्या आईचे सारे काही ऐकते! तुमचा मुलगा जर तुमचे ऐकत नसेल तर त्याचा चांगला कान पिरगाळा! पण त्याला शांत करा! चांगला वठणीवर आणा! त्याला योग्य वळण लावा! तो जोपर्यंत लोकांना असाच चावत राहील तोपर्यंत लोक शांतपणे जगू शकणार नाहीत.
आपल्या मुलांना चांगली शिस्त लावणे, त्यांना वाईट कामापासून परावृत्त करणे, हे प्रत्येक आईचे कर्तव्यच असते! तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार केल्याचे दिसत नाही. म्हणून तो वाईट मार्गाला लागला आहे. सारखा मेला लोकांना चावत सुटला आहे. शाळा आणि अभ्यासाकडे तर त्याचे लक्ष असेल असे मला मुळीच वाटत नाही! तुम्ही जरा तुमच्या मुलाकडे लक्ष द्या! त्याचे चावणे कमी करा! मला आता माझी आणि माझ्या आईची काळजी वाटते! आई म्हणते तुमचा हा खोडकर मुलगा आम्हाला देखील कधीही चालू शकतो. त्याच्या भीतीपोटी आम्ही तोंडावर सारखे पट्टी बांधून राहतो. आम्ही तुमच्या मुलाचे काहीही वाईट केलेले नाही. तरीही तुमचा मुलगा आम्हाला विनाकारण चावण्यासाठी टपला आहे. तुम्ही त्याच्या आई आहात ना? मग तुम्ही त्याला समजून सांगा. तुम्ही समजावून सांगितले तर तो तुमचे नक्की ऐकेल! सांगाल ना मग तुमच्या मुलाला समजावून!

आपली लाडकी
यशस्वी