39.2 C
Gondiā
Wednesday, June 10, 2026
Home Featured News नैसर्गिक झाडे वाचवा मोहीम तीव्र करण्याची गरज : डॉ. तुरकर

नैसर्गिक झाडे वाचवा मोहीम तीव्र करण्याची गरज : डॉ. तुरकर

0
7

गोंदियाः विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशभरात वृक्षारोपणाच्या मोहिमांवर मोठ्या गप्पा मारल्या जात असतानाच, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी डॉ. घनश्याम तुरकर यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘नवीन रोपे लावणे गरजेचे आहेच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे जे वृक्ष आधीपासूनच नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूला उगवले आहेत, त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
नैसर्गिकरित्या उगवलेले कडुनिंब, पिंपळ किंवा इतर स्थानिक वृक्ष वर्षानुवर्षे संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतात. याउलट, वृक्षारोपण मोहिमांतर्गत लावलेली रोपे, जर त्यांची दीर्घकाळ काळजी घेतली नाही, तर फार मोठ्या संख्येने नष्ट होतात. स्थानिक झाडे आणि वनस्पती केवळ हिरवळ वाढवत नाहीत, तर पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि मातीतील सूक्ष्मजीवांच्या संपूर्ण साखळीला (जैवविविधतेला) आधार देतात. नैसर्गिकरित्या उगवलेल्या या झाडांना ना ट्री-गार्डची ना गरज असते, पाण्याच्या टँकरचीः गरज असते ती फक्त त्यांना न तोडण्याची ! फक्त वृक्षारोपण करणे म्हणजे फुटक्या बादलीत पाणी भरण्यासारखे आहे बहुतेक शहरांमध्ये वृक्षारोपणाची केवळ आकडेवारी मोजली जाते. परंतु, लावलेली किती रोपे जिवंत राहिली आणि आधीपासून असलेल्या किती झाडांचे नुकसान झाले, याचा कोणताही ठोस हिशोब ठेवला जात नाही. कोणत्याही नवीन वृक्षारोपण मोहिमेपूर्वी प्रभाग (वॉर्ड), मोहल्ला आणि सोसायट्यांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या झाडांची मोजणी आणि मार्किंग केली पाहिजे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, ‘ज्यांची तुम्ही मोजणी करणार नाही, त्यांचे तुम्ही रक्षणही करू शकणार नाही. ‘अनेकदा ती एखादी औषधी वनस्पती असते किंवा फुलपाखरे आणि छोट्या जीवांचे सुरक्षित आश्रयस्थान असते. त्यामुळे अशी झाडे उपटून टाकण्याऐवजी, त्यांच्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि घाण हटवणे जास्त गरजेचे आहे. दुसरीकडे नैसर्गिक क्षेत्रांमध्ये डझनभर प्रकारची गवतं, झुडपे आणि वृक्ष स्वतःहून विकसित होऊन जैवविविधता समृद्ध करत असतात, असे डॉ. तुरकर यांनी सांगितले.