
लाखनी,दि.28ः राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव उड्डाणपुलाजवळ चार चाकी क्वालिस गाडीने पाठलाग करून ट्रक चालकाला थांबवून त्याच्याकडून तलवारीचा धाक दाखवून किमती वस्तू, रक्कम व मोबाईल लुटणारी टोळी ट्रक चालकाच्या सतर्कतेने जेरबंद करण्यात लाखनी पोलिसांना यश आले आहे. धर्मराज नेमीचंद मेश्राम (२३), भीमराज नेमीचंद मेश्राम (२२), सूरज परमानंद मेश्राम (२0) सर्व रा. सेलोटी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव उड्डाणपुलाजवळ साकोलीकडून नागपूरकडे जाणार्या ट्रकचालकाचा पाठलाग करून त्याला थांबवून तलवारीच्या धाक दाखवून ट्रक चालकाच्या जवळ असलेले किंमती वस्तू, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने लुटून पळून गेल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. ट्रक चालक कसातरी राष्ट्रीय महामार्गाने भिलेवाडा येथे पोहचून एका व्यक्तीच्या मदतीने कारधा पोलिस स्टेशन गाठले. ट्रक चालकाने घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली. लागलीच पोलिसांनी ट्रक चालकाच्या मदतीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळ लाखनी पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याने हे प्रकरण लाखनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
लाखनी पोलिसांनी त्या ट्रक चालकाची विचारपूस करीत असताना ट्रक क्लिनरची विचारपूस करण्याकरिता भिलेवाडा येथे जात असताना धारगाव शिवारात पुन्हा असाच लुटपुटीचा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. ट्रक चालकाने आरोपींना ओळखले. पोलिसांना पाहताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी जंगलात पळून गेलेल्या दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. घटनेत वापरलेली क्वालिस गाडी कारधा येथील टोल नाक्यावर पकडण्यात आली. तर जंगलात पळून गेलेल्या आरोपींना जंगलात दबा घेवून बसलेल्या स्थितीतून पकडले. एक आरोपी गावाच्या दिशेने पळत सुटला. त्यालाही धावून पाठलाग करत पकडण्यात यश आले.
ही कार्यवाही सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कोरचे, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस नायक प्रमोद टेकाम, संजय अरकासे, पोलिस शिपाई अंकुश गाढवे, चालक गणेश बांते यांनी केली. घटनेत वापरलेली क्वालिस गाडी, १ तलवार, २ लुटलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे.





