
गोंदिया : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांकरीता लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहायक शिक्षक खुद्द कागदोपत्री बांधकाम कामगार झाला. एवढेच नव्हेतर त्या शिक्षकाने बनावटी कागदपत्रांचा आधार घेत विभागाची फसवणूक केली. या प्रकरणाच्या चौकशीत बोगस कामगार म्हणून तसेच फसवणूक केल्याची बाब समोर आल्याने डुग्गीपार पोलिस ठाण्यात त्या शिक्षकाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश गुलाब बागळकर (३७) रा. खोबा ता. सडक अर्जुनी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी राज्य शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे लाभाच्च्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या लाभासाठी कामगारांना नोंदणीसाठी बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. आरोपी उमेश बागळकर हा सहायक शिक्षक पदावर कार्यरत असून १२ मार्च २०२५ पुर्वी नोंदणी केली. त्यातच नोंदणीचे नुतनीकरण करण्यासाठी विभागाच्या पोर्टलवर ९० दिवस काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र देखील सादर केले. या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे लक्षात येताच तोतया कामगार तथा सहायक शिक्षक याने विभागाच्या कर्मचाऱ्याविरूध्द खोट्या तक्रारी देखील केल्या. व नुतनीकरणासाठी यंत्रणेवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिक्षक उमेश बागळकर यांचे कागदपत्र बनावटी असल्याचा संशय आल्याने विभागाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान योजनेच्या लाभासाठी खोटे व बनावटी कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याची बाब निष्पन्न झाली. त्यामुळे विभागाच्या श्रीमती मंगला मसराम यांच्या फिर्यादीवरून डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षक उमेश बागळकर विरूध्द कलम ३१८ (२), ३३६ (३) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोनि गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली कठाणे करीत आहेत.





