
भंडारा,दि.01ः-केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात भंडारा जिल्हा हा दुसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत कन्हाळगावची देशपातळीवर दुसरा क्रमांकाने निवड झाली आहे. २ ऑक्टोबर २0२0 ला स्वच्छ भारत दिनी सकाळी १0.३0 वाजता व्हचरुअल कार्यक्रमाद्वारे गौरव करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांचे मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात स्वच्छतेच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने गगणभरारी घेतली आहे.
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे वतीने १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २0१९ या कालावधीत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी स्वच्छ सुंदर सामुदायीक शौचालय अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात राबविण्यात आले. या स्पर्धेमध्ये ग्राम पंचायत कन्हाळगाव ने सहभाग घेतला. या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय अभियान आणि सामुदायीक शौचालय अभियानाच्या पुरस्काराची घोषणा केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच करण्यात आली. या स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत ग्राम पंचायत कन्हाळगावने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून भंडारा येथे जिल्हास्तरावर एनआयसीच्या सभागृहात व्हचरुअल कार्यक्रमाद्वारे जल शक्ती मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, रतनलाल कटारिया यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे.





