
आमगाव,दि.07ःजिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आमगाव, गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांना मागील आठ महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचार्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. मानधन देण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे करूनही मानधन मिळाले नसल्याने आंदोलनाचा इशारा महिला परिचर संघटनेने दिला जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही जोखीम पत्कारून स्त्री परिचर आपले कर्तव्य बजावत आहेत. संक्रमित रुग्णांचा शोध घेणे, प्राणवायु नोंदविणे आदी कर्तव्ये बजावीत असतानाही यांना ओळखपत्र नाही, गणवेश नाही. तुटपुंज्या मानधनावर या अंशकालीन स्त्री परिचरांची शासन व प्रशासन बोळवन करीत आहे. तुटपुंजे मानधही वेळेवर दिले जात नाही. एकदोन नव्हे तर तब्बल आठ महिन्याचे मानधन प्रलंबित आहे. मागील कित्येक वषार्पासून हे कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात तुटपूंज्या मानधनावर कसा उदनिर्वाह करावा? असा प्रश्न या कर्मचार्यांपुढे उभा ठाकला आहे. मानधन प्रलंबित असल्यने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आरोग्य विभागात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांना मानधन विना विलंब देण्याचे अवर सचिवांचे जिल्हा परिषदेला निर्देश असूनही जिप प्रशासन मानधन देण्यास दिरंगाई करीत आहे. त्यामुळे आठवडाभरात आठ महिन्याचे मानधन द्यावे अन्यथा जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्या अध्यक्षा मंगला मेश्राम, जिल्हा अध्यक्षा नूतन तुरकर, जिल्हा सचिव छबी दमाहे, कोषाध्यक्षा शारदा शहारे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.




