
वाशिम, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली.
या प्रसंगी पृथ्वी, वायू, जल, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करून पृथ्वीच्या संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
शपथेमध्ये विशेष प्रसंगी किमान पाच वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करणे, पर्यावरणपूरक वाहतूक साधनांचा वापर करणे, पाणी व विजेचा काटकसरीने वापर करणे तसेच सेंद्रिय खतांच्या साहाय्याने परसबाग विकसित करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे आदी बाबींचा समावेश होता. या संकल्पांचे दैनंदिन जीवनात पालन करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांनी केले.
हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे शपथेमध्ये अधोरेखित करण्यात आले. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीदेखील ही शपथ घेण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच सर्वांनी ऑनलाईन पोर्टलवर ई-शपथ (E-Pledge) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढून हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





