34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ मृतदेहासाठी मागीतली १० हजारांची लाच;शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संतापजनक प्रकार

मृतदेहासाठी मागीतली १० हजारांची लाच;शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संतापजनक प्रकार

0
667

blank

गोंदिया ता. ८: शासकीय महाविद्यालयाचे दिवसेंदिवस धिंडवडे निघत आहेत. मृतदेह घरी नेण्याकरिता दहा हजार रुपयांची लाच मागीतल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला. या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
येथील शासकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा गेल्या कित्येक दिवसांपासून समोर येत आहे. प्रसारमाध्यमांसह, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवा करणाऱ्यांनी देखील यासंदर्भात अनेकदा संताप व्यक्त केला. वरिष्ठांकडे तक्रार केली. परंतु, हे प्रकार थांबताना दिसत नाही. कोविड काळ तर रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकरिता कमाईचे साधन झाले. या प्रकारावर पालकमंत्र्यांनी देखील कानउघाडणी केली होती. मात्र त्यानंतर देखील व्यवस्था सुधरली नाही. दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी खुद्द रुग्णालयाला भेट देत तंबी दिली होती. परंतु, त्याउपरही सुधारेल ते वैद्यकीय महाविद्यालय कसले. असाच एक गंभीर प्रकार आज(ता. ८) उघडकीस आला. तालुक्यातील मरारटोला येथील दुलिचंद सिंगनधुपे यांना लकवा झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री आठ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू लकव्याने झाल्याने दुलीचंद यांचा मुलगा छबीलाल सिंगनधुपे यांनी आपल्या वडीलांचा मृतदेह अंत्यसंस्काराकरिता देण्याची मागणी केली. मात्र त्यांना मृतदेह ताब्यात देण्यासाठी १० हजार रुपयांचा मागणी करण्यात आल्याचा आरोप छबीलाल सिंगनधुपे यांनी केला. सिंगनधुपे यांनी याची माहिती समाजसेवक विजय बहेकार यांच्याकडे केली. त्यांनी लागलीच रुग्णालय गाठून अधिष्ठाता यांची भेट घेतली. दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र अधिष्ठाता यांनी देखील वेळ मारून नेली. आधीच हलाखीची परिस्थिती असल्याने पैसे कुठून द्यावे, अशी विनवनी छबीलाल सिंगनधुपे यांनी केली. या प्रकाराची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून लाच मागणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

blank