
नवजीवन वसाहतीत आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद; कौशल्य, शिक्षण, रोजगार व पुनर्वसनाला प्राधान्य
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा विश्वास : ‘नव्या आयुष्याच्या वाटचालीत महाराष्ट्र पोलीस खंबीरपणे सोबत राहील’
गडचिरोली, दि. ७ : गडचिरोली जिल्ह्यात शांतता आणि विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
गडचिरोली येथील नवजीवन वसाहत, नवेगाव येथे आयोजित आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद व साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, आत्मसमर्पित माओवादी सदस्य व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, काही महिन्यांपूर्वीपर्यंत संघर्षाच्या दोन विरुद्ध बाजूंवर उभे असलेले लोक आज एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत, ही भारतीय संविधानावरील विश्वासाची मोठी ताकद आहे. आत्मसमर्पित सदस्यांनी शासन, पोलीस प्रशासन आणि लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दाखवला असून शासनही दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.
ते म्हणाले, आत्मसमर्पित सदस्यांना केवळ पुनर्वसन निधी देऊन थांबणार नाही, तर त्यांना कौशल्य विकास, रोजगार, शिक्षण, व्यवसाय, शेती, पशुपालन आणि इतर उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. आधार कार्ड, बँक खाते, मतदार यादीत नाव नोंदणी यांसारखी आवश्यक कागदपत्रे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. तरुणांनी शिक्षण, आयटीआय, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, दीर्घकाळ चाललेल्या हिंसाचारामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम झाला होता. मात्र आता रस्ते, वीज, सिंचन, उद्योग, पर्यटन आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोलीला राज्यातील प्रगत जिल्ह्यांच्या बरोबरीने आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जंगल, खनिजसंपत्ती, जलसंपदा आणि कष्टाळू नागरिक हे जिल्ह्याचे सामर्थ्य असून आगामी काळात विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या गावांमध्ये जाऊन इतरांना देखील मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करत त्यांनी शांत, सुरक्षित आणि समृद्ध गडचिरोली घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
नव्या आयुष्याच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र पोलीस कायम सोबत : सदानंद दाते
यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आत्मसमर्पित सदस्यांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय संविधान प्रत्येकाला मुख्य प्रवाहात परत येण्याची संधी देते आणि आत्मसमर्पण धोरणामुळे अनेकांना नवे जीवन सुरू करण्याची संधी मिळाली आहे.
भूतकाळातील चुका मागे ठेवून उत्पादक कार्य, रोजगार आणि समाजोपयोगी जीवनाकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून आत्मसमर्पित सदस्यांना आवश्यक ती सर्व मदत करेल. त्यांची सुरक्षा, पुनर्वसन आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात समावेश करण्यासाठी पोलीस दल कोणतीही कसर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आत्मसमर्पित माओवादी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासनाने आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांसाठी शासनाचे धन्यवाद मानले तसेच भविष्यात आवश्यक पडतील या दृष्टीने आपल्या मागण्या मान्यवरांच्या समक्ष मांडल्या.
पुनर्वसन निधी, साहित्य आणि विविध योजनांच्या लाभांचे वितरण
कार्यक्रमादरम्यान भूपती दीपा चला तुला मंजुला कलम नागेश तलांडी आदीआत्मसमर्पित माओवादी सदस्यांना केंद्र व राज्य शासनाच्या पुनर्वसन निधीचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच महिला बचत गटातील सदस्यांना शिलाई मशीन, पुरुषांना स्प्रे पंप, ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाने आदी विविध साहित्य व लाभांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याशिवाय गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष पुढाकारातून आत्मसमर्पित सदस्य अशोक मासा होळी यांची यशस्वी नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना अपत्यप्राप्ती झाल्याबद्दल त्या दाम्पत्याचा विशेष सत्कार करून संसारोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले.
८१९ माओवादी सदस्यांनी केले आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून शासनाच्या आत्मसमर्पण धोरणामुळे आणि प्रभावी पुनर्वसन व्यवस्थेमुळे आजपर्यंत एकूण ८१९ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित सदस्यांना शिक्षण, आरोग्य, कृषी, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या विविध योजनांशी जोडून त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी प्रास्ताविकातून दिली.कार्यक्रमाची सांगता आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या मुलांनी सादर केलेल्या राष्ट्रगीताने झाली.





