
ब्रम्हपुरी,दि.09-ः मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घटना ब्रह्मपुरी-आरमोरी मार्गावरील खरकडा ते रुही दरम्यान पहाटे 4.30 दरम्यान घडली. रोहीत अशोक चट्टे (20) प्रशांत मुरलीधर सहारे (20) दोघेही रा. खरकाडा असे मृत युवकांचे नाव आहे.रोहीत व प्रशांत दोघांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण गेली. दोघांनाही पोलीस बनून देशाची सेवा करायची होती. नुकतीच राज्यसरकारने 12 हजार पदांची पोलीस भरती करण्याची घोषणा केली. त्यामुळे दोघांनीही शारीरिक क्षमता चाचणीची तयारी सुरु केली. नेहमीप्रमाणे दोघेही धावण्याचा सराव करण्यासाठी शुक्रवारी पहाटे 4 वाजता खरकाडा फाटा ते रुही मार्गावर गेले. व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. सकाळी फिरायला जाणा?्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, पोलीस शिपाई विकास गेडाम यांनी घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास ठाणेदार खाडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.




