34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
10

blank

पुणे –फुगेवाडी, दापोडी व हडपसर येथील प्रथमदर्शनी मेथेनॉल मिश्रित गावठी दारू प्राशन घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ मे ते ४ जून या कालावधीत धडक कारवाई करुन एकूण १ कोटी ४७ लाख २७ हजार १४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता , प्रसाद सुर्वे, पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार पुणे विभागाने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे.
या कालावधीत एकूण १४२ गुन्हे नोंद करण्यात आले असून एकूण ११६ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये ८ हजार ४७२ लि. तयार गावठी दारू जप्त करण्यात आली असून गावठी दारू तयार करण्यासाठीचे ६९ हजार २७१ लि. रसायन जागीच नाश करण्यात आले आहे. तसेच ११ हजार ७३३ लि. परराज्यातील व बनावट मद्य ही जप्त करण्यात आले आहे. दारूच्या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एकूण ११ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
सर्व विक्री व निर्मितीचे हॉटस्पॉट संवेदनशील गाव येथील हातभट्टी केंद्र नेस्तनाबूत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच हातभट्टी निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल पुरवठादारांना गुन्ह्यात आरोपी करून कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.सराईत गुन्हेगारा कडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ नुसार चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी एकूण १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत.
मेथेनॉल मिश्रित दारूप्राशन करून नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्या गुन्ह्याशी संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ गुन्हे नोंदविले होते त्यांचा तपास सीआयडी सोबत करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी श्री.गजानन पाटील यांनी पुणे व पिं. चि. मनपा आयुक्त यांना त्यांचे हद्दीमध्ये विषारी दारूचे दुष्परिणाम व त्यास प्रतिबंध घालण्यासाठी ध्वनिफीत घंटागाडीच्या ध्वनिक्षेपावरून वाजविणे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गावठी दारूच्या नोंदविलेल्या गुन्ह्याची ठिकाणे अवैध बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशाच प्रकारच्या सूचना सर्व नगरपरिषद, नगरपालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उप विभागीय दंडाधिकारी , सर्व पोलीस उपायुक्त पुणे व पिंपरी-चिंचवड यांना विषारी दारूसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी कलम ९३ खाली अधिकाधिक रक्कमेचे बंधपत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच,ग्रामसेवक, तलाठी यांना त्यांच्या गावामध्ये गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्याबाबत व सरकारी जमिनीचा अवैध धंद्यांसाठी वापर होत असल्यास त्याला प्रतिबंध करण्याबाबत सूचना देण्याबाबतच्या सूचना (नोटीस) राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच महावितरणलाही अशा अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या गुन्हेगारांना देण्यात आलेल्या अधिकृत किंवा अनधिकृत वीज जोडण्या तोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच गावठी दारू निर्मिती करणारऱ्यास गुळाचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यानाही कलम १६८ खाली प्रतिबंधात्मक सूचना देण्यात आल्या आहेत.
मेथेनॉल बाबत सह आयुक्त, औषध प्रशासन विभाग यांना भेटून पुणे जिल्ह्यातील सर्व मेथेनॉल अनुज्ञप्ती धारक, पुरवठादार यांची यादी प्राप्त करून घेण्यात आलेली आहे. सर्व घटकांना राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन भा.ना.सु. संहितेच्या कलम १६८ नुसार नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. औषध प्रशासन विभागाकडून मेथेनॉलच्या पुरवठादारांच्या व्यवहारांची तपासणी करून अवैध करण्यासाठी मेथेनॉलचा पुरवठा केल्यास कडक कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

blank