अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांचे निर्देश

0
92

सांगली, दि. 17 : शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना आधार देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशा सूचना कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिल्या.

पंचायत समिती जत येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, कोरानाचा संसर्ग वाढू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण करून काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

तत्पूर्वी त्यांनी मिरज तालुक्यातील आरग, लिंगनूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, जत तालुक्यातील कुडनूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतिपिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना दिलासा दिला. कवठेमहांकाळ येथे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी प्रसंगी आमदार सुमनताई पाटील उपस्थित होत्या. तसेच संबंधित तालुक्याचे तहसिलदार व कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.