नागपूर: जमू काश्मीर मधील गुजर सेक्टर मध्ये पाकिस्तान सैनिकांनी शुक्रवारी सिझ फायरचे उल्लंघन करून केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांत काटोल येथील सैनिक भूषण सतईचे पार्थिव सोमवार सकाळी 10.25 ला त्याच्या फैलपुरा येथील घरी पोहचले. शहीद भूषणला मानवंदना देण्याकरिता काटोल शहरातील नागरिक मोठया संख्येने एकत्र आले होते. पार्थिव घरी पोहचत घरच्यांचे अश्रू अनावर झाले.नागरिकांसह घरच्यांनी शहीद जवानाला मानवंदना दिली. या क्षणी उपस्थित्यांचे मन गहिवरून आल्याचे चित्र दिसत होते. नागरिकांनी शहीद भूषण अमर राहे व भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. चिडलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरुध्द निषेधही नोंदविला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काटोल शहरातील मुख्य रस्त्यांनी त्याचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. यात आबालवृद्धांचा व महिला भगिनींचा समावेश होता.