35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय पदवीधर मतदार संघात काँग्रेस उमेदवाराला जिल्ह्यात अतिविश्वास नडणार?

पदवीधर मतदार संघात काँग्रेस उमेदवाराला जिल्ह्यात अतिविश्वास नडणार?

0
895

blank

गोंदिया,दि.22 : येत्या १ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक रंगात येवू लागली आहे. रणसंग्रामात १९ उमेदवार असले तरी गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर मतदार मात्र, उमेदवारांच्या बाबतीत अनभिज्ञच आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांकडून प्रचाराची धुरा फक्त पक्ष कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. यामुळे नेहमीप्रमाणे उमेदवारांचे दर्शन न घेताच मतदान करावे लागणार काय? असा सवाल पदवीधर मतदारांकडून उपस्थित ेकेला जात आहे.गोंदिया जिल्ह्यात भाजप जोमाने कामाला लागली आहे.तर दुसरीकडे मात्र काँग्रेसचे उमेदवार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोघांवरच जबाबदारी देत इतरांना डावलल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदार व खासदारांना काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी हे स्वतः अद्याप भेटलेले नाहीत.त्याचप्रमाणे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांकडे जाण्याचीही तसदी घेतली नाही.उलट काँग्रेसच्या कार्यालयात बोलावून घेत चर्चा करीत असल्याचे चित्र आहे.वंजारी यांना काँग्रेसमधील नाराजी भोवण्याची शक्यता वर्तवली जात असून जिल्हाकाँग्रेस अध्यक्षही इतर नेत्यांशी सवांद न साधता जिल्ह्यासाठी असलेल्या प्रदेश सचिवाच्या निर्देशावरच चालत असल्याने काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकूण १९ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यातून १ उमेदवार तर उर्वरित १८ उमेदवार पर जिल्ह्याचे आहेत. असे असले तरी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रचाराचा रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना अद्यापही उमेदवारांचे नाव माहिती नाही. एवढेच नव्हेतर उमेदवारांची ओळख नसल्याचीही खंत मतदार व्यक्त करीत आहेत. मात्र, प्रचाराचा धुरा उमेदवारांनी जे मतदार नाहीत अशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिली आहे. तर दुसरीकडे उमेदवार आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. याकरीता कार्यकर्त्यांनी मतदारांना समस्या सोडविण्याचे आश्वासन देत मतांचा जोगवा मागावा, अशी विनंती करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात प्रमुख दोन उमेदवारांनी हजेरी लावली असली तरी एकही उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचलेला नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या आयोजनातून त्या ठिकाणी मार्गदर्शन करीत जिल्ह्यातून काढतापाय घेत आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच उमेदवाराचे दर्शन होत नाही तर निवडणुकीनंतर अपेक्षा काय कराव्यात, असा सवाल मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.अपक्ष रिंगणात असलेले गोंदिया निवासी वरिष्ठ पत्रकार एड.विरेंद्र जायस्वाल यांनी सोशल मिडियातून आपला जनसंपर्क सुरु केला आहे.त्याचप्रमाणे विदर्भवादी उमेदवार घोंगे यांनीही सोशल मिडियातूनच प्रचाराला जोर दिल्याचे दिसून येत असले तरी इतर उमेदवारांचा मात्र थांगपत्ता दिसून येत नाही.
उल्लेखनिय असे की, गोंदिया जिल्हा नागपूर मतदार संघामध्ये येतो. मात्र, पदवीधर मतदार संघातून निवडून आलेलेले जनप्रतिनिधी या जिल्ह्याकडे ढुकून पाहत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

blank