
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने (Congress) आता विधान परिषद निवडणुकीत परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
यवतमाळ विधान परिषदेची निवडणुकीची चुरस जरी संपली असली तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 5 पैकी 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने यातील राजकीय नाट्यमय घडामोडींनी ही निवडणूक राज्यात चांगलीच चर्चेत राहिली. महाविकास आघाडीचे साहेबराव कांबळे, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून आणलेला दबाव आणि अजित पवार गटाच्या साजिद बेग, अपक्ष सय्यद फारुख यांनी उमेदवारी मागे घेतल्याने शिंदे सेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध झाले. या सर्व राजकीय घडामोडी जुळून आणण्यासाठी धुरंदर म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते.
महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी 3 जूनला आपला अर्ज मागे घेतला. यामागे ठाण्यातील ‘नंदनवन’ कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. मात्र पुरेसे मतदार नसल्याचे कारण सोमर दाखवीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून सय्यद फारूक यांनी सुद्धा अर्ज मागे घेतला. तर भाजपचे बंडखोर नितीन भुतडा यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची धावती भेट घेतली आणि वेट आणि वॉच भूमिका घेण्यास सांगितले. शेवटी अर्ज मागे घेण्याच्या काही क्षणाआधी माजी मंत्री मदन येरावार यांच्या सोबत येत युती धर्माची आठवण येत उमेदवारी मागे घेतली.
साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार सय्यद फारुख याला महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या घरी सर्व काँग्रेसच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली. ही बैठक सुरू असतानाच सय्यद फारूक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तर महायुती मधीलच घटक पक्ष असलेले अजित पवार गटाकडून साजिद बेग यांनी सुद्धा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या आदेशावरून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. साहेबराव कांबळे यांच्या उमेदवारी मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडनं यवतमाळच्या दत्ता चौकात त्यांच्याविरुद्ध आंदोलन ही करण्यात आले लोकशाहीची थट्टा आणि पैसे फेकून विरोध दर्शविण्यात आला.





