प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्या- हिंदुराव चव्हाण

0
174

भंडारा दि. 24: प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी) सन 2020-21 करिता राबविण्यास शासनाकडुन मंजुरी प्राप्त झालेली आहे. भंडारा जिल्हयाकरिता या योजनेअंतर्गत गहू, हरभरा व उन्हाळी भात ही अधिसुचित पिके आहेत. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसुचित विमा क्षेत्र घटक ग्राहय धरण्यात येईल. भंडारा जिल्हयाकरिता या योजनेअंतर्गत गहू, उन्हाळी भात या पिकांसाठी जिल्हयातील सर्व 40 महसुल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. हरभरा पिकांकरीता तुमसर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यातील 34 महसुल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

 या योजनेअंतर्गत प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान जसे हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पिक पेरणीपासुन काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, ईत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान ईत्यादी बाबीकरिता नुकसान भरपाई देण्यात येते.

सदर योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. बिगरकर्जदार शेतकऱ्यांना  योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. सदर अर्ज बँक, कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँक आपले सरकार सेवा केंद्र किंवा विमा कंपनीचे अधिकृत विमा प्रतिनिधी यांचेमार्फत विमा हप्ता भरावयाचा आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी) सन 2020-21 अंतर्गत गहू, हरभरा व उन्हाळा भात या पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा अंतिम दिनांक गहू व हरभरा पिकांसाठी 15 डिसेंबर 2020 आहे. व उन्हाळी भात पिकासाठी  दिनांक 31 मार्च 2021 आहे. पिक विमा योजनेअंतर्गत गहू पिक (रब्बी हंगाम) करिता शेतकऱ्यांनी भरावयाची विमा हप्त्याची रक्कम रुपये 468.75 प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रुपये 31250 प्रति हेक्टर आहे. तसेच हरभरा पिक (रब्बी हंगाम) करिता विमा हप्त्याची रक्कम रुपये 375 प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रुपये 25000 प्रति हेक्टर आहे. तसेच उन्हाळी भात पिकाकरिता विमा हप्त्याची रक्कम रुपये 826.50 प्रति हेक्टर असुन विमा संरक्षित रक्कम रुपये 55100  प्रति हेक्टर आहे .

 प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अधिसचित क्षेत्र, पिके, विमा हप्ता व योजनेच्या इतर तपशिलाकरिता क्रॉप इंशुरन्स हे मोबाईल अॅप शेतकऱ्यांकरिता मराठी भाषेमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. या अॅप च्या माध्यमातुन योजनेबाबत माहिती वेळोवळी शेतकऱ्यांना पाहता येईल. तरी, प्रधानमंत्री पिक विमा योजना (रब्बी) सन 2020-21  चा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  घेण्याबाबत हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी आव्हान केले आहे.