40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ राज्यभरात आरटीओ सेवा ठप्प,संपाचा दुसरा दिवस

राज्यभरात आरटीओ सेवा ठप्प,संपाचा दुसरा दिवस

0
20

गोंदिया,दि.१७ः वाहतूक नियंत्रण आणि वाहन परवान्यांसह महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या टोलवाटोलवीला कंटाळून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवार दिनांक १६ जूनपासून राज्यभरात बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे गोंदियासह राज्यातील सर्व प्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील (आरटीओ) कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे.आंदोलनाचा आज(दि.१७) दुसरा दिवस असून कर्मचारी आजही आपल्या आंदोलनावर ठाम दिसून येत आहेत.परिवहन विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर होऊन साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, असे असूनही अद्याप सेवा प्रवेश नियम मोटार वाहन विभागाने लागू केलेला नाही.त्यामुळे कर्मचारी संघटनेेने राज्यव्यापी बेमुदत संप न्याय मागण्यांसाठी पुकारला आहे.या विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना हक्काच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे. पदोन्नती रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून, या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्याकरीता हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.