38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता अनैतिक संबंधातून चिमुकल्याचा खून

अनैतिक संबंधातून चिमुकल्याचा खून

0
204

blank

भंडारा-अनैतिक संबंधातून एका सहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पहेलाजवळील चोवा येथील नाल्यावरील पुलाच्या पायलीत दडवून ठेवला. स्थानिक गुन्हे शाखा व आंधळगाव पोलिसांनी तीन दिवसात या घटनेचा छडा लावत आरोपी निलेश चंदन गजभिये (२३) रा. सालेबर्डी ता. मोहाडी याला अटक केली आहे.
आंधळगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या सालेबर्डी येथील विहान (६) हा चिमुकला २२ नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो सापडला नसल्याने आंधळगाव पोलिसात तक्रार करण्यात आली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण आणि आंधळगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु, विहानचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, तीन दिवसांपासून गावातीलच निलेश चंदन गजभिये (२३)याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या बयानात वारंवार तफावत जाणवत होती. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत धक्कादायक खुलासा केला.
आरोपी निलेशचे विहानच्या आईशी अनैतिक संबंध होते. रविवारी विहानने ते प्रत्यक्ष बघितले होते. त्यामुळेच निलेशने विहानला ठार मारण्याचा कट रचला. त्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास निलेशने विहानला मोबाईल दाखविण्याच्या उद्देशाने फुस लावून दुचाकीने भंडाराकडे निघाला. त्यानंतर तो पहेला जंगल परिसराकडे गेला. तिथे चोवा मेंढा रोडवरील नाल्यात उतरून विहानचा गळा दाबून त्याची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पुलावरील रपट्यातील पायलीत विहानचा मृतदेह फेकून दिला. याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी आरोपी निलेशविरुद्ध भादंवि ३0२, २0१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास ठाणेदार बारसे करीत आहेत.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम लांबाडे, हवालदार मडामे, शैलेश बेदूरकर, प्रशांत कुरंजेकर, पंकज भित्रे, चेतन पोटे, कौशिक गजभिये, अमोल खराबे, तसेच आंधळगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार बारसे, पोलिस उपनिरीक्षक गणेश पडवार, सहाय्यक फौजदार मदनकर, प्रफुल वालदे, बाभरे, वैद्य, अमोल मस्के, सिद्धेश्‍वर शेळके यांनी पार पाडली.

blank