
गडचिरोली,दि.27ःकेंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार व संविधान विरोधी धोरणाचा निषेध करण्याचा निर्धार करीत देशभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला भारत बंद दरम्यान आयोजित आंदोलनात गडचिरोलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व महिला नेत्या जयश्री वेळदा यांचे नेतृत्वात आयोजित करण्यात आलेला बैलबंडी मोर्चा लक्षवेधी ठरला. आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि शासकीय, निमशासकीय सेवेतील कर्मचारी संघटनांसह बचतगटांच्या महिला तसेच शेतकरीही आपल्या बैलबंड्यास सहभागी झाले होते.
सदर बैलबंडी मोर्चा गडचिरोली येथील गांधी चौकातून दुपारी १ वाजता सरकार विरोधात घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकार्यांनी कालच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर संविधान दिन साधेपणाने साजरा करण्याच्या सुचनेसह कोणतेही आंदोलन, मोर्चा, किंवा ईतर सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मज्जाव केला होता. या अनुषंगाने पोलीसांनी सुरूवातीलाच मोर्चाला अनुमति नाकारली. परंतु हा विरोध पत्करून शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी नियोजित मोर्चा काढला व शांततापूर्वक पूर्णही केला.मोजक्या प्रतिनिधिसह आपआपल्या मागण्यांचे निवेदन देण्याची विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकार्यांना शेकापचे वतीने निवेदन दिले. यावेळी भाई रामदास म्हणाले, की केंद्र सरकारने आणलेले बिल हे शेतकरी आणि कामगार विरोधी असुन संपूर्ण देशभर या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. देशात भाजपचे सरकार असुन हे सरकार सामान्य शेतकरी, कष्टकरी, गरिबांवर अन्याय करणारे व भांडवलदारांना पूरक असे कायदे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतू देशातील जनता भाजप सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या कायद्यातील तरतूदी अतिशय भयावह आहेत. सिलींग रद्द, शेतकरी असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या पिकाला हमी भाव दिला जाणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्याच संपविण्याचा घाट केंद्राने घातला असल्याचे ते म्हणाले. निवेदन दताना शेकापच्या नेत्या जयश्री वेळदा, खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युुवा जिल्हहाध्यक्ष अक्षय कोसनकर, सहचिटणीस संजय दुधबळे यांचेसह शेकाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चात मोठय़ा संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोंदणीकृत बांधकाम कामगार, बचत गटांच्या महिला, कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.





