सडक अर्जुनी,दि.०४ः महाराष्ट्र शासनाच्या हत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ अंतर्गत सडक अर्जुनी लुक्यातील खोडशिवनी ग्रामपंचायतीची तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. खोडशिवनी ग्रामपंचायत आता जिल्हास्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात पोचली असून, याच्या अंतिम मुल्यमापनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तज्ञ अधिकाऱ्यांची विशेष जिल्हास्तरीय चमू १ जून रोजी गावात दाखल झाली होती. या समितीने खोडशिवनी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन विविध विकासकामांची व शासकीय दप्तराची (रजिस्टर) कसून तपासणी केली. या उच्चस्तरीय मूल्यमापन समितीमध्ये प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पांगोरे आणि विस्तार अधिकारी सी. एम. सुर्वे यांचा समावेश होता.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता सडक अर्जुनी तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. या सर्व ग्रामपंचायतींमधून उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खोडशिवनी ग्रामपंचायतीची तालुकास्तरावर निवड करण्यात आली. सदर ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अंतिम स्पर्धेत असल्यामुळे, नियमानुसार तिचे मूल्यमापन बाह्य जिल्ह्यातील (यवतमाळ) विशेष चमूकडून करण्यात आले.
शासनाने ठरवून दिलेल्या कडक निकषांनुसार खोडशिवनी ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख डिजिटल कारभारावर आधारित ‘सुशासनमुक्त पंचायत’, कर वसुली आणि लोकसहभागातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ‘स्वनिधी व लोकवर्गणी’, पर्यावरणपूरक समृद्ध गाव आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनावर आधारित ‘स्वच्छ व हरित गाव’ आणि मनरेगा सह सर्व शासकीय योजनांचा प्रभावी मेळ घालणारे ‘योजनांचे अधिसरण’ या मुख्य निकषांवर आधारित गुणांकन करण्यात आले. शासनाच्या निकषांप्रमाणे सर्व कामे पूर्ण करून आपला गाव समृद्ध कशाप्रकारे करता येईल, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष दिले होते.





