
गोंदिया,दि.30ः- नागपूर पदवीधर मतदारंसघासाठी उद्या 1 डिसेंम्बर 2020 रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पात्र असलेल्या ओबीसी आंबेडकरी, वंचित, समता मानणाऱ्या पदवीधर मतदारांवर मोठी जबाबदारी आली आहे.त्यातच ओबीसी आपली शक्ती दाखवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची भाषा सोशल मिडियातून वापरत असतानाच गोंदिया विधानसभा मतदारसंघात असलेल्या 8 मतदान केंद्रावर काँगेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई कवाडे या महाविकास आघाडीत असलेल्या पक्षाचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्या प्रचाराची व मतदारांना मतदान करवून घेण्याची मोठी जबाबदारी युवा नेते अशोक(गप्पू)गुप्ता यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोपवली आहे.त्यामुळे अशोक गुप्ता यांच्यासाठी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर ही निवडणुक पहिलीच अग्निपरिक्षा ठरणार असून त्यांना वंजारी यांच्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.विधानसभा अध्यक्ष व काँग्रेसचे वरिष्ठ नेते नानाभाऊ पटोले,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वेा खासदार प्रफुल पटेल,उमेदवार अभिजित वंजारी,माजी आमदार राजेंद्र जैन, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव किरसान,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनी तसेच गोंदियाचे प्रभारी किरण पांडव यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून गोंदिया मतदारसंघातील 8 मतदान केंद्रावरील बुथखर्चापासून ते मतदारांना ने आण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्विकारल्याने वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले असून महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यामध्येही या निवडणुकीसाठी एक नवचैतन्य एकदिलाने दिसून येत आहे.खासदार प्रफुल पटेल,विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी सर्वकाही प्रयत्न करण्याची तयारी गप्पू गुप्ता यांनी केली असून त्यांच्यासाठी या निवडणुकीतील मतदानाचा निकालही महत्वाचा ठरणार आहे.





