33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नळ योजना नसलेल्या गावांसाठी मिशनमध्ये योजना प्रस्तावित करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र...

नळ योजना नसलेल्या गावांसाठी मिशनमध्ये योजना प्रस्तावित करावी – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

0
27

blank

बुलडाणा, दि. 12 : शासनाने प्रत्येक गाव, वाडी व वस्त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी जल जिवन मिशनची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक घराला दरडोई दररोज 55 लीटर पाणी प्रत्येक कुटूंबाला पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार या मिशनमध्ये नवीन नळयोजना प्रस्तावीत कराव्यात. मिशनमधील आराखड्यात समाविष्ट करण्यात आलेल्या योजनांची कामे दर्जेदारपणे पूर्ण करावीत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ज्या गावांसाठी नळयोजनाच नाही, अशा गावांना जल जीवन मिशनमध्ये नळयोजना प्रस्तावित करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जलजीवन मिशन आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार राजेश एकडे, आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश इंगळे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

या आराखड्यातंर्गत समाविष्ट गावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी पुरवठ्याची कामे करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री महणाले, गावांमधील योजनांची पुनरावृत्ती टाळावीत. योजनेसाठी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत बघावा. पाण्याअभावी काही दिवसानंतर योजना बंद पडतात. परिणामी शासनाचा खर्च वाया जातो. त्यामुळे अंतर जास्त असले, तरी पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत घ्यावा. प्रादेशिक ऐवजी स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांवर भर द्यावा. जल जीवन मिशनच्या सुधारीत आराखड्याला मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करावा.

पालकमंत्री पुढे म्हणाले, नळ योजनांसाठी वीजपुरवठा महत्वाचा असतो. अनेक योजना पुर्ण होतात. मात्र वीज पुरवठ्या अभावी त्या सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन योजनांसाठी वीजेचे रोहीत्र आराखड्यात समाविष्ट करावे. तसेच एक्सप्रेस फिडर आवश्यक असल्यास ते घ्यावे. जेणेकरून भविष्यात रोहीत्रावरील अति दाबमुळे नळ येाजना बंद पडणार नाही. तसेच अनेक योजनांचे वीज मीटर बंद आहे, मात्र देयक सुरूच आहे. अशा योजनांवरील बंद मीटरचा वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करावा. जेणेकरून त्या योजनेवरील देयकाची थकीत रक्कम वाढणार नाही. यासाठी महावितरणने ड्राईव्ह राबवावा. आतापर्यंत नळ जोडणी नसलेल्या अंगणवाडी व शाळांना या मिशनमधून नळ जोडणी उपलब्ध करून द्यावी.

यावेळी डॉ.संजय रायमूलकर म्हणाले, सौर उर्जा कृषी पंपासाठी मोठी पेंडन्सी आहे.  तरी पात्र अर्जदारांनी सौर कृषी पंप उपलब्ध करून द्यावे. सौर उर्जेवर आधारीत पंपाबाबत तक्रारी असल्यास त्यांचे तातडीने निरसन करावे.  बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

blank