
पवनी-ग्रामपंचायत क्षेत्रात विकासकामे करताना विश्वासात न घेणे, नियमबाह्यरित्या विकासकामांचे बांधकाम करणे व ग्रामपंचायत पदाधिकार्यांसह नागरिकांशी अपमानजनक वर्तन करणे यासोबत अन्य आरोपांना घेऊन एका महिला सरपंच विरोधात अविश्वास ठराव घेण्यासाठी ग्रामसभेच्या आयोजनाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी संबंधित आयोजनास परवानगी दिली. मात्र सदर परवानगी नियमबाह्य असल्याचा आरोप जिल्हा सरपंच संघटनेने पत्रपरिषदेतून केल्याने अड्याळ येथील महिला सरपंचाच्या अविश्वासावरून वाद पेटला आहे.
शासनाने गाव विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतला विशेष महत्त्व दिले असताना अनेक गावच्या सरपंचावर खोटारडे आरोप घेऊन अविश्वासाचे प्रयोग केले जातात. दरम्यान वेळेत होणारे विकास कामे लांबल्याने गावविकासात बाधा येते. असाच प्रकार पवनी तालुक्यातील अड्याळ या मोठय़ा ग्रामपंचायतीत घडला असल्याचे मत जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अविश्वास ठराव संबंधी घेण्यात आलेल्या बैठकीच्या निर्णयानंतर एक महिन्याच्या आत विशेष ग्रामसभा लावण्याची तरतूद असताना दोन महिन्यानंतर लावल्या गेल्यामुळे प्रशासनिक कार्यावर प्रश्नचिन्ह उठवून राजकीय पाठबळाने सदर प्रकार झाला असल्याचा आरोपही सरपंच संघटनेच्या पदाधिकार्यांनी करतांना नवीन वादाला पालवी फोडली आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना पदाधिकारी म्हणाले,सन २0१७ ला झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाली. यावर अविश्वास आणताना दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याची तरतूद आहे. राज्यात महाआघाडी सरकारच्या काळात कोविड-१९ वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा रद्दचा आदेश असताना अविश्वासाठी बोलविण्यात आलेली ग्रामसभा नियमबाह्य असल्याने विसंगती तयार करणारी आहे. असे सांगून कालबाह्य पद्धतीने घेण्यात येत असलेल्या ग्रामसभेचा पदाधिकार्यांनी निषेध नोंदविला आहे. सरपंच जयश्री कुंभलकर यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध किंबहुना ग्रामसभेच्या विरोधात सरपंच महासंघ कोर्टात जाणार असल्याचे सूतोवाच पदाधिकार्यांनी केले.
पत्रपरिषदेला भंडारा जिल्हा सरपंच सेवा महासंघ जिल्हाध्यक्ष यादव मेंगरे, सरचिटणीस दीपक तिघरे, सरपंच हरदोली सदाशिव ढेंगे, सरपंच सेवा महासंघ तालुका अध्यक्ष अनिता गिर्हेपुंजे, सरचिटणीस सरपंच महासंघ पवनी नूतन विकास कुझ्रेकर, अड्याळच्या सरपंच जयश्री महेश कुंभलकर, लोणारा सरपंच सतीश घरडे, भावड सरपंच शरद तिघरे, मालची सरपंच राजू तलमले, वासेळा सरपंच किशोर ब्राह्मणकर, कलेवाडा सरपंच मोहन घोगरे, नेरला सरपंच नितीन कोदाणे, सोनेगाव सरपंच रविकांत आरिकर, आसगाव सरपंच विपिन बोरकर इत्यादी उपस्थित होते.





