
भंडारा,दि.15: केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातील कोलकातास्थित राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे शासकीय ग्रंथालयांसाठी असमान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार 2020-21 साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे. त्यासंदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जाचा नमुना सुधारित स्वरुपात असावा. अर्जामध्ये नमुद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागद पत्रासह इंग्रजी तसेच हिंदी भाषेमध्ये परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास 8 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल खुमेंद्र बोपचे यांनी केले आहे.




