33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home शैक्षणिक राष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठास सुवर्ण पदक

राष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठास सुवर्ण पदक

0
25

मुंबई, दि. 19 डिसेंबर: भारतीय विद्यापीठे संघद्वारे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले आहे. कृषी या गटातून “मल्टी एग्रो मॅकेनिझम” या प्रकल्पास राष्ट्रीय सुवर्ण पारितोषिक बहाल करण्यात आले आहे. राजीव गांधी प्राद्यौगिक विद्यापीठ भोपाळ येथे  १५ आणि १६ डिसेंबर २०२० ला आभासी पद्धतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन स्तरावर संपन्न होते. प्रथम स्तरावर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य विभाग स्तरावर प्राथमिक फेरी संपन्न होते. पाच विभागातील अंतिम विजेते हे राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात. या राष्ट्रीय महोत्सवात देशातील एकूण ४५ विद्यापीठांचे संशोधन प्रकल्प पात्र ठरले होते. पश्चिम क्षेत्र विभागातून मुंबई विद्यापीठ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विक्रांत पाल, कुणार पवार आणि पंकज पाटील या तीनही विद्यार्थ्यांनी मिळून “मल्टी एग्रो मॅकेनिझम” नावाचे यंत्र तयार केले. पेरणी, फवारणी, कापणी, मातीची निगा, दोन रोपातील गवत काढणे, गवताची मुळे उखळून काढणे अशी सहा विविध कामे ही एकाच यंत्राद्वारे करण्याची किमया साधणारे अत्यंत अल्प दरातील यंत्र या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे हे यंत्र सौर ऊर्जेवर चालणारे आहे. दैनदिन शेतीच्या कामात हे यंत्र मोठे योगदान देणार असल्याचा विश्वास या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ विकास विभागाने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.