
मुंबई,दि.20ः- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांची बैठक संपली. राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरा, सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारला दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी जोमाने कामाला लागा, गावागावात जनहिताची कामे करून जनतेची विश्वास संपादन करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. यासाठी मुंबईत झालेल्या शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेने त्यांच्या संपर्क प्रमुखांना रणनिती आखुन सतर्क केले आहे.
शिवसेना राज्यातील सर्व ग्राम पंचायत निवडणुका लढणार आहे. यासंदर्भात रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १५ जानेवारी २0२१ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र, राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे.





