
मुंबई, दि. ०८ जानेवारी: मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामार्फत दरवर्षी देण्यात येणारे प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती-पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्येष्ठ संशोधक पुरस्कारासाठी मान्यवर लेखक, कवी, संशोधक, निबंधकार, फुले आंबेडकरवादाचे भाष्यकार आणि बौद्ध विचारांचे संशोधक डॉ. यशवंत मनोहर यांची निवड करण्यात आली. डॉ. यशवंत मनोहर यांचे आंबेडकरी मराठी साहित्य, आंबेडकरी आस्वादक समीक्षा, मराठी कविता आणि आधुनिकता, दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरुप, समाज आणि साहित्य समीक्षा, साहित्य संस्कृतीच्या प्रकाशवाटा, साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र, बुद्धांचा ग्लोबल सिद्धांत यांसारखी ग्रंथसंपदा प्रसिद्ध आहे. या सर्व मौलिक संशोधनाची दखल घेऊन त्यांना प्रा. अ. का. प्रियोळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तसेच सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधाच्या पारितोषिकासाठी डॉ. नीतिन आरेकर यांच्या पीएचडी प्रबंधाची समितीने एकमताने निवड केली आहे. डॉ. नीतिन आरेकर यांच्या पीएचडी प्रबंधाचा विषय “वाड्मय समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी – चिकित्सक अभ्यास” असा आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी भाषा दिनी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असल्याचे मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांनी सांगितले.
मागील गेल्या २५ वर्षांपासून ज्येष्ठ नामवंत संशोधक प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती-पारितोषिक प्रदान केले जातात. दरवर्षी मराठीतील एका नामवंत ज्येष्ठ संशोधकास आणि मुंबई विद्यापीठात सादर केलेल्या पीएचडी प्रबंधापैकी एका सर्वोत्कृष्ट पीएचडी प्रबंधास हे पुरस्कार दिले जातात.





