35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home Top News भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू

भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू

0
510

blank

भंडारा,दि.09 : महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.blank

या SNIC मध्ये आऊटबॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालकांना वाचवण्यात आले तर आऊट बॉर्न युनिटमधील दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली बालके एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचे वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच या वॉर्डमध्ये ठेवले जाते.

दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालय आगीप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेतblank

राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त

भंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही.  मी मृत बालकांच्या कुटुबीयांचं सांत्वन करतो. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ देवो,” असं अमित शाह यांनी ट्वीट केलं आहे.

blank