
नागपूर,दि.10ः- गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकार राज्यात पोलिसांच्या भरतीची घोषणा करीत आहे. परंतु अद्यापही ही भरती घेण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर १२ हजार पोलिसांच्या भरतीची घोषणा केली, परंतु पुन्हा आता त्या भरतीला स्थगिती दिली. याशिवाय ओबीसींच्या विविध विभागातील असलेला नौकर्यांचा बॅकलॉग भरून देण्यात यावा या मागणीसाठी येत्या सोमवार ११ जानेवारी रोजी सकाळी ९.३0 वाजता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरस्थित निवासस्थानापुढे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे संयोजक डॉ. बबनराव तायवाडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून दिली.
डॉ. तायवाडे यांनी सांगितले की, आज राज्य शासनाच्या अखत्यारित विविध विभागांमध्ये जवळपास दीड लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये १.१0 लाख पदे ही ओबीसींचा बॅकलॉग आहे. पुरोगामी महाराष्ट्रात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. आज महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन जवळपास सव्वा वर्ष लोटले आहे. या सरकारने १२ हजार पोलिसांच्या पदभरतीची घोषणा केली होती. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही पदभरती पुढे ढकलण्यात आली आहे. एका समाजाच्या प्रश्नासाठी उर्वरित संपूर्ण ओबीसी समाजावर हा एक प्रकारे अन्याय आहे. आम्ही शासनाकडे या पदभरतीची सुरुवात करण्याची मागणी केली, परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणजेच सरकार पोलिस भरतीसाठी गंभीर नसल्याचा आरोपही तायवाडे यांनी केला. त्यांनी सांगितले की, राज्याच्या वाढत्या भौगोलिक परिस्थितीमुळे पोलिस बल अपूर्ण पडत आहे. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होऊ शकते यात तिळमात्र शंका नाही, अशी भीती समाजापुढे निर्माण होत आहे. त्यातच पोलिस विभागात लाखो जागा रिक्त असताना पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या वयात वाढ होत आहे. सरकारच्या या दिरंगाईमुळे समाजातील अनेक विद्यार्थ्यांना मिळणार असलेल्या रोजगाराच्या संधी यापासून विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारचे या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्याकरिता हे ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले. तसेच या आंदोलनात महासंघाचे सर्व पदाधिकारी सलग्नित संघटनेचे पदाधिकारी, जातीय संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पोलिस दलात नोकरीस इच्छुक विद्यार्थी युवक युवतींनी मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही तायवाडेंनी केले आहे. पत्रपरिषदेला महासंघाचे शरद वानखेडे, कल्पना मानकर, त्रिशरण सहारे, ऋषभ राऊत, रोशन कुंभलकर आदी उपस्थित होते.




