
गोंदिया: – राजमाता जिजाऊ, क्रां.सावित्रीमाई फुले, माता फातिमा शेख या त्यागी धैर्यवानांच्या वैचारिक संघर्षपूर्ण आठवणीना अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांच्या जयंती प्रित्यर्थ बंधुत्व मैत्री, कौमी एकतेचा संदेश देण्यासाठी संविधान मैत्री संघ अवामे मुस्लिम मदीना मस्जिद कमेटी, समता सैनिक दल यांच्या संयुक्त वतीने “सामाजिक एकता संमेलन” कार्यक्रम स्थानिक मदीना मस्जिद चौक लॉन गौतमनगर बाजपेयी वार्ड येथे कोविड19 नियमांचे पालन करून विविध समाजवर्गाच्या उपस्थितीत उत्साहाने पार पडले. राजमाता जिजाऊ, क्रां. सावित्रीमाई आणि माता फातिमा शेख यांच्या छायाचित्रांसमोर दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर, महामातेंच्या मानवी कल्याणासाठी केलेल्या संघर्ष, त्याग, समर्पण आणि योगदानाचा प्रेरणादायक इतिहास सांगितला गेला.
या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून संविधानाचे अभ्यासक विचारवंत शब्बीर पठाण यांनी उपस्थितासमोर विचार पुष्प मांडले “इल्म (शिक्षण आणि ज्ञान) संपादन करणे ही समाजाची सर्वात मोठी गरज आहे. इल्म (ज्ञान) बरोबरच देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेची माहिती असावी. सर्व वर्ग समुदायानी ते घटना वाचली व समजली पाहिजे. किमान त्यांच्या हक्कांबद्दल घटनेत काय तरतूद आहे ते तरी जाणून घेतले पाहिजे. राज्यघटनेतील लेखी अधिकाराचे हक्क जर आपल्याला माहित नसतील तर छळ शोषण कायम राहील आणि गुलामांप्रमाणे जीवन जगावं लागेल. देशाचे नागरिक म्हणून, माणूस म्हणून आपण जीवन कसं जगावं, कसं रहावं, आमचं भवितव्य हे भारतिय राज्यघटनेतुन कळते. महामानवानी म्हटले आहे की “गुलामांना गुलामगिरीची जाणिव करुन द्या, ते पेटून उठतील”. शोषण थांबवायचं असेल तर उज्ज्वल भविष्यासाठी भारतिय राज्यघटनेला आपलं गुरू मानावं.
या प्रसंगी ओबीसी संघर्ष कृती समितीचे कोषाध्यक्ष कैलाश भेलावे, उपाध्यक्ष तीर्थराज उके, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ प्रमुख वसंत गवळी, युवा बहुजन मंचचे अध्यक्ष सुनील भोंगाडे, छप्परबंद शाह बिरादरी चे सदर अफजल शाह, मदीना मस्जिद कमेटीचे सदर ईशान शेख, सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहारचे अध्यक्ष बाबूराव जनबंधू, पूर्व पार्षद हेमंत बडोले, संविधान मैत्री संघाचे संरक्षक मित्र आभा मेश्राम, लक्ष्मी राऊत, आंबेडकरी संस्कार केंद्र प्रशिक्षक माणिक गोंडाणे, युवा प्रतिनिधी म्हणून कु.चेतना रामटेकर, फिरदोस खान प्रामुख्याने हज़र होते. वैचारिक संदेश देताना उपस्थीत मान्यवर म्हणाले “जाती धर्म वर्ग समूह नंतर आहेत, सर्वप्रथम आम्ही भारतिय आहोत. भारताचे नागरिक म्हणून आपण जाती धर्मासाठी आपसात लढू नये. भाईचारा बंधुता असावी असे राज्यघटनेनेही म्हटले आहे.”
कार्यक्रमाचे संचालन संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे यांनी केले व समता सैनिक दलाचे प्रचारक महेंद्र कठाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदीना मस्जिद कमेटीच्या वतीने युवा प्रतिनिधी तैसीम शाह यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी मोहम्मद सलीम, सय्यद मुनीर, मो.नसीम शेख, सलीम कुरेशी, संजू यादव, नसीम शाह, रफिक शेख, युसुफ शेख, विनोद तुरकर, आरिफ कुरेशी, प्रेमलाल मेश्राम, द्रविंद्र मेश्राम, हंसराज बनसोड, रोशन शेख, प्रवीण बेलगे, सोहेल शेख, शुभम ठाकूर, दीपक हरिणखेडे, राहुल वालदे, आकाश ढोमणे, हैदर अली सय्यद व अन्य मान्यवर उपस्थित होते.
🔆मा. तिर्थराज उके ( उपाध्यक्ष ओबिसी संघर्ष कृती समीती)– मानवता धर्म हे सर्वोच्च धर्म आहे. आणि समाजात मानवतावादी विचार पेरणारे संत गुरू महामानव यांच्या मार्गाचा अवलंब केल्याने आपण स्वतःचा, आपल्या कुटूंबाचा आणि समाजाचा विकास करू शकतो आणि समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.
🔆मा. वसंत गवळी (ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, मातंग समाज संघ प्रमुख) – महामानवांचे मानवतावादी विचार समाजात पेरण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विविध संघटन समूहाने पूढाकार घ्यावा.
🔆 मा.महेंद्र कठाणे( समता सैनिक दल प्रचारक):- सर्व समाजवर्गातील महापुरुषांच्या मानवतावादी विचार संकल्पना घटनेत समाविष्ट केले गेले आहे. म्हणून राज्यघटनेतून प्राप्त हक्कांचे रक्षण करण्यासाठी सामाजिक एकतेचा संदेश वेगवेगळ्या समाज वर्गा पर्यंत पोचवावा लागेल. आणि यासाठी समता सैनिक दल संघर्षासाठी तैयार आहे.
🔆मा.आभा मेश्राम (संविधान संरक्षक मित्र) – चला एक नवा भारत बनवूया, सर्वांना माणूस बनवूया, एकत्रित नवीन सुरुवात करूया, आपण सर्वजण हातात हात घालू .. आता पुरे अत्याचार … (कविता)
🔆कु. चेतना रामटेकर (युवा प्रतिनिधी) – विपरीत परिस्थितीत फातिमा शेख यांनी त्यानी केलेल्या शिक्षण सेवा संघर्षात कोणाचाही भेदभाव केला नाही. समाज आणि इतिहासकारांनी पण भेदभाव न करता त्यांचे त्याग, समर्पण आणि संघर्ष, योगदान विसरू नये.
🔆फिरदोस खान (मुस्लिम युवा प्रतिनिधी): – समाजातील बहुसंख्य महिलांमध्ये आजही नेतृत्व दिसून येत नाही. त्यात नेतृत्व करण्याची गुणवत्ता नाही असे नाही. कुठेतरी ते आपले विचार व्यक्त करण्यासाठी घाबरतात. त्याना प्रतिबंधित केल्या जात आहे किंवा संधी दिली जात नाही. यासाठी महिलांचे सुप्तगुण समाजासमोर संपूर्णपणे येणे आवश्यक आहे.
🔆मा.हेमंत बडोले (सलाहकार सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहार गौतमनगर, पूर्व पार्षद):- स्वतंत्र भारतात आपल्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचे प्रतिकार करण्याचे अधिकार संविधानाने दिलेले आहे. अन्याय अत्याचार विरोधात सर्व वर्ग गटांनी एकत्रितपणे लढा देणे आणि हक्कांसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे.
🔆अतुल सतदेवे(संविधान मैत्री संघ संयोजक- पत्रकार सामा.कार्यकर्ता):- पारतंत्र्य गुलामी आपल्या दारावर दस्तक देत आहे. जाती-धर्म परंपरावाद अफूची गोळी आहे. वर्तमान बिकट परिस्थितीला समजुन, जाती धर्म वर्ग समूह संघटने चे स्वार्थ, परंपरावाद सोडून सर्व समाज वर्गाला एकत्र येणे, एकसंघ होने गरजेचे आहे. संविधान मैत्री संघ स्वयंस्फूर्त, निरंतर, निस्वार्थपणे जागृती कार्य पार पाडत आहे.




