
वाशिम, दि. ११ : वाशिम येथील विदाता प्रशिक्षण केंद्र येथे आज ११ जानेवारी रोजी ‘आत्मा’ अंतर्गत ग्रामिण युवकांसाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ११ ते १७ जानेवारी २०२१ दरम्यान युवक-युवतींसाठी माती-पाणी परीक्षण व एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरील कौशल्य याबाबत निवासी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र करडा संचालित माती परीक्षण प्रयोगशाळेव्दारे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन आज, ११ जानेवारी रोजी करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठा अंतर्गत वाशिम येथे कार्यरत असलेल्या कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. बि. डि. गिते यांनी उदघाटन केले. अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषि अधिकारी डी. के. चौधरी होते. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी मिलींद कांबळे, कृषि अधिकारी एस. डि. वानखेडे, जिल्हा समन्वयक आत्मा श्री एस. टि. राउत व माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख एस. के. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री. चौधरी यांनी जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्याकरीता एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन पध्दतीचा वापर करुन पिक उत्पादन शाश्वतरित्या वाढविण्याकरीता सर्वागिण प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. कृषि मित्रांनी माती परीक्षण या महत्वाच्या विषयाचे कौशल्य प्रशिक्षण घेवुन गावागावात कृषिदुत म्हणुन कार्य करावे, असेही श्री. चौधरी म्हणाले.
डॉ. गिते यांनी शेत जमिन सजिव असल्याचे सांगुन, याकरीता शेतीमध्ये काडी कचरा कुजवुन तसेच सेंद्रिय व हिरवळीचे खते यांचा वापर वाढवुन सेंद्रिय कर्बाची उपलब्धता वाढवावी असे ते म्हणाले.
श्री. कांबळे यांनी माती परीक्षणाचे महत्व व परिक्षणाच्या आधारे संतुलित खतांचा वापर व सुपिकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन करणेबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातुन संपुर्ण वाशिम जिल्हयातील युवकांना शास्त्रीय पध्दतीने माती परीक्षण करण्याबाबत प्रशिक्षीत करण्यात येत असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामिण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कृषि अधिकारी एस. डि. वानखेडे व आत्मा कार्यालयाचे एस. टि. राउत यांनी सुदधा विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणास जिल्हयातील सहाही तालुक्यातील निवडलेले एकुण १५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माती परीक्षण प्रयोगशाळेतील कर्मचारी सुबोध कापसे, दता काळे, अर्चना कदम,दिनेश चौधरी,मधुकर भोपाळे व आकाश अंभोरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विदाताचे प्रशिक्षण अधिकारी अभिषेक देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार तंत्र अधिकारी माती परीक्षण प्रयोगशाळा गंगाधर काळे यांनी मानले.




