38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ गोंदियाला आधुनिक रेल्वे अनुरक्षण सुविधांची भेट

गोंदियाला आधुनिक रेल्वे अनुरक्षण सुविधांची भेट

0
3

blank

गोंदिया,६ जून-दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी गुरुवारी गोंदिया येथील रेल्वे अनुरक्षण व परिचलन व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी १२ डब्यांच्या मेमू रेकच्या देखभालीसाठी डेमू शेड विस्तार प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नॉन-ईओटी कव्हर शेडचे लोकार्पण केले. तसेच डेमू शेड, कोचिंग डेपो, पीट लाईन आणि रनिंग लॉबीची पाहणी करून सुरक्षा, अनुरक्षण गुणवत्ता आणि परिचालन कार्यक्षमतेचा आढावा घेतला. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता मनीष
अग्रवाल, नागपूर मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता, मुख्यालय व मंडळातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी तसेच रेल्वे परामर्शदात्री सहयोग समितीचे सदस्य उपस्थित होते. महाव्यवस्थापकांनी डेमू शेडमधील रेल्वे इंजिन आणि मेमू-डेमू रेकच्या देखभाल प्रक्रियेची पाहणी केली.
आधुनिक उपकरणे व तांत्रिक सुविधांचा आढावा घेत त्यांनी नव्या नॉन-ईओटी कव्हर शेडमुळे रेल्वेच्या अनुरक्षण क्षमतेत वाढ होऊन रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी गोंदिया कोचिंग डेपो आणि पीट लाईनची पाहणी करून डब्यांची स्वच्छता, देखभाल, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा मानकांची तपासणी केली. प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवास मिळावा म्हणून उच्च दर्जाची अनुरक्षण व्यवस्था कायम ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रनिंग लॉबीच्या पाहणीदरम्यान त्यांनी लोको पायलट व सहायक लोको पायलट यांना उपलब्ध सुविधा, क्रूव्यवस्थापन प्रणाली, सुरक्षा सल्ला यंत्रणा आणि विश्रांती सुविधांची माहिती घेतली. सुरक्षा ही रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता असून प्रत्येक कर्मचाऱ्याची सतर्कता, शिस्त आणि कार्यनिष्ठा सुरक्षित रेल्वे संचालनासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक गुप्ता यांनी, नागपूर मंडळात सुरू असलेल्या कामांबाबत महाव्यवस्थापकांना माहिती दिली.

blank